पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत श्री राम मंदिरांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. मोठ्या उत्साहात अयोध्येत आज हा सोहळा रंगला होता. कोरोना काळात अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान सोशल मीडियावरही राम मंदिराचा मोठा उत्साह दिसला. याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्री राम यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन काँग्रेसने आता मोदींवर निशाणा साधला आहे.
अनेक शतकांनंतरची प्रतीक्षा फळास आली आणि आज राम मंदिराची पायाभरणी झाली. पंतप्रधान मोदींच्या काळात ही पायाभरणी झाल्याने त्यांचे अनेकांकडून कौतुक होत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रभु रामचंद्रांचा एक फोटोही व्हायरल झाला आहे. यात पंतप्रधान मोदी हे प्रभू रामचंद्रांना हात धरून अयोध्येत येत आहेत. यावर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी निशाणा साधला आहे.
हा फोटो रिट्विट करत शशी थरुर म्हणाले की, तुम्ही ना प्रेम शिकले, ना त्याग शिकले, ना करुणा शिकले, ना अनुराग शिकले, स्वतःला रामपेक्षा मोठे दाखवून आनंदी होणाऱ्यांनो, तुम्ही श्री राम चरित मानसचा कोणता भाग शिकला आहे? असं म्हणत त्यांनी मोदींना सवाल केला आहे.