रियाची चौकशी करणाऱ्या डीएसपींना करोनाची लागण; सीबीआय पथकाचीही होणार टेस्ट

मुंबईः सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सुशांतची मैत्रिण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी करणारे वांद्रे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांना करोनाची लागण झाली आहे. त्रिमुखे यांच्यासह त्यांच्या संपुर्ण कुटुंबालाही करोनानं गाठलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर रिया आणि त्रिमुखे यांच्यातील कॉल डिटेल समोर आले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर रियानं अभिषेक यांच्यासोबत फोनवर चर्चा केली होती. चार फोन कॉल्स आणि एक एसएमएसद्वारे या दोघांमध्ये संपर्क झाला होता. त्यामुळं मोठा वाद निर्माण झाला होता. तसंच, सीबीआयकडं तपास गेल्यानंतर सीबीआय अधिकाऱ्यानी मुंबई पोलिस दलातील त्रिमुखे यांना नियुक्त करण्यात आलं होतं. त्यामुळं त्रिमुखे यांना भेटलेल्या सीबीआय पथकाचीही करोना चाचणी होणार आहे.

सीबीआयचे पथक मुंबईत आल्यानंतर त्रिमुखे आणि परमजित सिंह दहिया यांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. तसंच, सुशांत प्रकरणात स्पष्टीकरणही मागण्यात आलं होतं. असं बोललं जात आहे.

दरम्यान, राज्यात करोनाबाधित पोलिसांमध्ये १५७४ अधिकारी आणि १३ हजार २१८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दररोजचा बंदोबस्त, तपासणी, चेकनाक्यावरील ड्युटी अशा विविध कामांत अडकून पडलेल्या पोलिसांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. राज्यात दोन हजार ७७२ अॅक्टिव्ह पोलिस असून त्यातील ३५८ अधिकारी आणि २ हजार ४१४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत १५१ पोलिसांना लागण झाली आहे.

तसंच, रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंब यांच्याबद्दल सुशांतचे चाहते उलटसुलट चर्चा करत आहेत. सध्या रिया ही सीबीआय चौकशीसाठी डीआरडीओ गेस्ट हाऊसला जात आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी रियाला संरक्षण देण्याचा विचार केला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, रियाच्या घरापासून ते डीआरडीओ गेस्ट हाऊस या दरम्यान रियाला आणि तिच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!