मुबंई : दहावीच्या पुढील उच्च शिक्षणासाठी वाढलेली स्पर्धा लक्षात घेत शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळू शकलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत त्यांचा मासिक खर्च भागवण्यासाठी भत्ता देण्यात येतो.(35 crore distributed by Minister Dhananjay Munde)
अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा( Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana) 35 कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून वितरित करण्यात आला असून लवकरच लाभार्थी विद्यार्थ्यांच्या संलग्न खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक योजनांना निर्बंध लागलेले असून राज्याची आर्थिक स्थिती सध्या बिकट आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या स्वाधार योजनेंतर्गत हक्काच्या निधीला ब्रेक लागू नये यासाठी धनंजय मुंडे सतत प्रयत्नशील होते. त्यामुळे अर्थ खात्याने तातडीने यासाठी 35 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. धनंजय मुंडे यांनी याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
काही दिवसांपूर्वीच या योजनेची व्याप्ती मोठ्या शहरांपुरती मर्यादित न ठेवता ती वाढवून तालुका स्तरावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतला होता.