दिल्ली । काँग्रेसने दहा नेत्यांची एक समिती स्थापन केली. त्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांतील प्रत्येकी पाच काँग्रेस खासदारांना या समितीत घेण्यात आले. त्यात राहुल गांधी समर्थकांचा भरणा आहे. या सर्व बाबी नाराज नेत्यांना खटकल्या आहेत. पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी ठोस पावले उचलण्याकरिता काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर दबाव आणण्याच्या दृष्टीने नाराज नेते नवी रणनीती आखत आहेत असे या नेत्यांच्या निकटवतीर्यांनी सांगितले.संसदेचे आगामी अधिवेशन १४ सप्टेंबरपासून ते १ ऑक्टोबर या कालावधीत होणार असून, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील नाराज नेत्यांच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल घडावेत यासाठी नेमके काय करता येईल याबाबत या नाराज नेत्यांमध्ये दररोज चर्चा सुरू आहे. अशा संवादासाठी या नेत्यांनी एक गट स्थापन केला असून त्यामध्ये गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भूपिंदर सिंह हूडा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी यांचा समावेश आहे. या गटातील नेत्यांची पुढील आठवड्याच्या प्रारंभी एक बैठक होणार असून त्यात भविष्यातील रणनीती ठरविली जाईल.
गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल हे पक्षसंघटनेबाबत त्यांची मते प्रसारमाध्यमांद्वारे मांडून काँग्रेस अध्यक्षांवरील दबाव वाढवत आहेत. पक्षश्रेष्ठींना नाराज नेत्यांनी पाठविलेल्या पत्राचा मसुदा तयार करणारे काँग्रेस नेते आनंद शर्मा यांना पक्षातील सध्याच्या वातावरणाबद्दल प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, थोडी प्रतिक्षा करा व काय घडते आहे ते पाहा.
लोकसभेत काँग्रेसच्या उपनेतेपदी मनीष तिवारी किंवा शशी थरूर यांना डावलून तुलनेने नवीन असलेले खासदार गौरव गोगोई यांची निवड करण्यात आली हे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना फारसे आवडलेले नाही. दररोजच्या टिष्ट्वटमुळे पक्ष मजबूत होणार नाही.
बिहारमधील काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख अखिलेश प्रसाद यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींना पाठविलेल्या पत्रावर मीही स्वाक्षरी केली आहे. आम्ही बिहारमधील विधानसभा निवडणुका जिंकू शकतो पण त्यासाठी योग्य दिशेने कृती झाली पाहिजे.