मुंबई । शनिवारी, २९ ऑगस्टपासून पाणीपुरवठा पूर्ववत होईल.मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या उध्र्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या महिनाभरात झालेल्या दमदार पावसामुळे जलसाठय़ात वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजता सातही तलावांतील एकूण जलसाठा १३,७७,६९० दशलक्ष लिटर म्हणजेच ९५.१९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे ५ ऑगस्टपासून लागू करण्यात आलेली पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर संबंधित गावांचा पाणीपुरवठाही नियमित केला जाणार आहे.
जून व जुलै महिन्यात तलाव क्षेत्रात कमी प्रमाणात पाऊस झाला होता. जुलैअखेरीस तलावांमधील एकूण जलसाठा केवळ ३४ टक्क्य़ांवर आला होता. त्यामुळे पालिकेने २० टक्के पाणीकपात लागू केली होती. त्यानंतर तलाव क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे २१ ऑगस्टला पाणीकपात १० टक्क्यांवर आणण्यात आली. तलाव क्षेत्रात सातत्याने पावसाने हजेरी लावल्याने जलसाठय़ात लक्षणीय वाढ झाली.
मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करावा लागतो. त्यासाठी सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असणे आवश्यक आहे. सातही तलावांत मिळून १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा होणे आवश्यक असते.