नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत करोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येतेय. याच दरम्यान आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (satyendra jain) यांनी गृह सचिव अजय भल्ला (ajay Bhalla) यांना एक पत्र लिहिलंय. करोना चाचण्या वाढवण्यात येऊ नयेत यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप जैन यांनी आपल्या पत्रात केला आहे. दिल्लीमध्ये करोना चाचण्या रोखण्याचा आरोपही सत्येंद्र जैन यांनी गृह मंत्रालयावर केलाय. ‘काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गृह मंत्रालयाकडून दिल्लीच्या अधिकाऱ्यांवर दिल्लीत चाचणी आणखी वाढवल्या जाऊ नयेत यासाठी दबाव टाकण्यात येतोय’ असं जैन यांनी म्हटलंय.
हे वाचा : आदित्य ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार?
दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचं पत्र
दिल्लीत निवडूण आलेलं सरकार आहे आणि हे सरकार आपल्या जनतेसाठी निर्णय घेण्यात सक्षम आहे. असं असतानाही दिल्लीत करोना चाचण्या करण्यासाठी अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) सरकारला का रोखलं जातंय? असा प्रश्न विचारत दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी गृह सचिव अजय भल्ला यांना पत्र लिहिलंय.
दिल्लीच्या अधिकाऱ्यांवर या पद्धतीनं असंविधानिक आणि बेकायदेशीर दबाव का टाकला जातोय? तुम्हाला विनंती करतो की अशा पद्धतीचा दबाव टाकला जाऊ नये, असं जैन यांनी आपल्या पत्रात लिहिलंय.
हे वाचा : पुन्हा देवेंद्र फडणवीस व आणि अजित पवार एकत्र
पत्रात अमित शहांच्या (amit shah) नावाचाही उल्लेख
दिल्ली सरकार दिल्लीमध्ये करोना चाचण्यांची संख्या वाढवत आहे. केंद्र सरकारनं यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. मी हे पत्र माननीय गृह मंत्री अमित शहा यांना लिहिणार होतो, परंतु त्यांची तब्येत बरी नसल्यानं आणि ते एम्समध्ये दाखल असल्यानं मी हे पत्र तुम्हाला लिहितोय, असंही आरोग्यमंत्र्यांनी गृह सचिवांना उद्देशून म्हटलंय.
४०,००० चाचण्यांचं लक्ष्य
पत्रात केलेल्या उल्लेखानुसार, दिल्लीमध्ये वाढत्या करोना संक्रमणादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी २६ ऑगस्ट रोजी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत प्रत्येक दिवशी होणाऱ्या २०,००० टेस्ट वाढवून ४०,००० हजारांपर्यंत नेण्याचा आदेश दिलाय.
अमित शहा एम्समध्ये
उल्लेखनीय म्हणजे, २ ऑगस्ट रोजी अमित शहा करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. करोनावर मात केल्यानंतर पुन्हा प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणानं अमित शहा यांना १७ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय.