पुणे (पिंपरी) : प्रत्येक कोरोना रुग्णाला उपचार मिळावेत, बेड उपलब्ध व्हावा त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोविड सेंटर उभारले आहे. सर्वांनी एकत्र येत ही लढाई लढली पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit Pawar) यांनी व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व माझ्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन होणार असल्याने, आम्ही एकत्र येणार, ही ब्रेकींग न्यूज झाली. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) येणार असल्याचे कोणाला माहीत झाले नाही. अन्यथा त्यांचेही नाव त्यात आले असते, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
हे वाचा :कुऱ्हाडीने वार करत सासऱ्याने केला सुनेचा खून
पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिकेने चिंचवड येथे ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात २०० खाटांचे कोविड सेंटर उभारले. उपमुख्यमंत्री पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी त्याचे उद्घाटन झाले. त्यावेळी पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले, कोरोना (corona) हे मोठे संकट आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करण्यापेक्षा चूक लक्षात आणून देऊन काम केले पाहिजे. काळानुरूप काही पावले आपल्याला उचलावी लागली. कोरोनाची लढाई सर्वांनी एकत्र येऊन लढली पाहिजे. प्रत्येक कोरोना रुग्णाला बेड उपलब्ध झाला पाहिजे. त्यासाठी महापालिका प्रयत्नरत आहे. गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करताना खबरदारी बाळगली पाहिजे. कोरोनाचे संकट गणरायाने दूर करावे, असे साकडे घालतो.
फडणवीस म्हणाले, राज्यात दररोज १४ ते १५ हजार रुग्ण आढळत आहेत. यातील २० टक्के रुग्णांची विशेष काळजी घ्यावी लागते. पुणे जिल्ह्यात कोरोना चाचणी वाढविण्यात आल्याने रुग्ण संख्या वाढली. त्या सर्वांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. महापालिकेने त्यासाठी कोविड सेंटर उभारले आहे. सर्वांनी मिळून कोरोना विरूध्दची लढाई लढू या.