करोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ (Act of God) असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असे सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना वस्तू व सेवा कराची (जीएसटी) थेट नुकसानभरपाई देण्यास केंद्र हतबल असल्याचे गुरुवारी जणू कबूल केले. मात्र या बैठकीमध्ये निर्मला यांनी ‘देवाची करणी’ म्हणजेच Act of God चा उल्लेख केल्यानंतर गुगलपासून सोशल नेटवर्किंगपर्यंत यासंदर्भातील सर्चचे प्रमाण वाढल्याचे दिसले. ट्विटर आणि फेसबुकवरही याचसंदर्भातील चर्चा सुरु होत्या. मात्र ट्विटवर महाराष्ट्रातील एका भाजपा नेत्याचे ट्विटही चांगलेच व्हायरल झालं आहे. विशेष म्हणजे हे ट्विट पंतप्रधान मोदी हे दैवी अवतार असल्याचा दावा करणारे आहे.
ते ट्विट आलं चर्चेत
निर्मला यांच्या या व्यक्तव्यानंतर सोशल मिडियावर Act of God बद्दल चांगलीच चर्चा रंगली. यामध्येच अनेकांनी केंद्र सरकार आता थेट देवाला आर्थिक परिस्थितीसाठी दोष देत असल्याची टीका केली. तर काहींनी महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी २०१८ साली १२ ऑक्टोबर रोजी केलेल्या ट्विटचा संदर्भ दिला. या ट्विटमध्ये वाघ यांनी, “भारताचे पंतप्रधान परम आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी हे श्री विष्णु चे अकरावे अवतार आहेत,” असं म्हटलं होतं. त्यांनी मराठीबरोबरच हिंदीतही मोदींनी टॅग करुन ट्विट केलं होतं.