“ज्या कोणी व्यक्ती आमच्या या प्रस्तावाचा विरोध करत आहेत तो केवळ आपलं पद जाऊ नये यासाठी करत आहेत. जर पक्षांतर्गत निवडणुका झाल्या तर पक्षाची कामगिरी पहिल्यापेक्षाही उत्तम होईल. अन्यथा पुढील ५० वर्षेदेखील काँग्रेस विरोधकांच्याच भूमिकेत दिसेल,” असं म्हणत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. “तुम्ही जेव्हा एखादी निवडणूक लढता तेव्हा कमीतकमी ५१ टक्के मतं तुमच्या बाजूनं असतात आणि पक्षात केवळ तुम्ही २ ते ३ लोकांच्या विरोधात निवडणूक लढवता. ५१ टक्के मतं मिळणाऱ्या व्यक्तीचीच त्या पदावर नियुक्ती केली जाते. जी व्यक्ती जिंकेल तिच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या विषयावर भाष्य केलं.
हिताचा विचार करणारे स्वागत करतील
“जे पदाधिकारी वा राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आमच्या प्रस्तावाचा विरोध करत आहेत, त्यांना माहितीये की निवडणुका झाल्यास ते कुठेच दिसणार नाही. जे कुणी काँग्रेसच्या हिताचा विचार करत आहेत, ते आमच्या पत्राचं स्वागतच करतील,” असं आझाद यांनी नमूद केलं.
एक टक्काही पाठिंबा नाही
“निवडणुकीचा एक फायदा असा होतो की, तुम्ही निवडणूक लढवता, तेव्हा कमीत कमी पक्ष तुमच्यासोबत उभा राहतो. सध्या अध्यक्ष होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला एक टक्केही पाठिंबा मिळू शकत नाही. कार्यसमितीचे सदस्य निवडून आले, त्यांना हटवता येत नाही. मग समस्या काय आहे?,” असा सवालही त्यांनी केला.
काँग्रेस अध्यक्षपदी पूर्णवेळ व कार्यक्षम व्यक्तीची निवड करण्यात यावी, अशी मागणी करत पक्षातील २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रावरून काँग्रेसमध्ये अतंर्गत कलह निर्माण झाला होता. त्यानंतर काँग्रेस कार्यसमितीच बैठक पार पडली. या बैठकीतही गोंधळ झाला होता. त्यानंतर अध्यक्ष निवडीच्या वाद शमला गेला.