जम्मू काश्मीरच्या नियंत्रणरेषेजवळील कुपवाडा भागातील माछील सेक्टरमध्ये स्वातंत्र्यानंतर तब्बल 74 वर्षांनी वीज पोहोचली आहे. भारत पाकिस्तान सीमेलगतच्या भागात मागील काही दिवसांपासून विकासकामांना वेग आला आहे. सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
कुपवाडा भागातील केरन सेक्टरमध्ये 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी वीजपुरवठा सुरू करण्यात आला. पुढच्या वर्षी येणाऱ्या स्वातंत्र्यदिनापर्यंत जम्मू काश्मीरच्या दुर्गम भागात वीज पोहोचवण्याचा उद्देश आहे असे जम्मू काश्मीरच्या वीजपुरवठा विभागाच्या प्रमुखांनी सांगितले आहे.
आतापर्यंत माछील सेक्टरच्या 20 गावांमध्ये डिझेल जनरेटद्वारे वीजपुरवठा होत होता. मात्र आता पॉवर ग्रीडच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जात आहे. माछील सेक्टरच्या जवळपास 25,000 लोकांना याचा फायदा होणार आहे. पॉवर ग्रीडच्या माध्यमातून येथे वीज पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. पुढच्या 20 दिवसांमध्ये पूर्ण क्षमतेने 24 तास येथे वीज उपलब्ध करण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
माछील सेक्टरचा भाग भारताच्या उत्तरेतील सर्वांत उंच भाग असून जमीनही टणक आहे. तेथे खांब उभे करणे कठीण काम होते. आता उभारण्यात आलेल्या यंत्रणेच्या माध्यमातूनच वीजनिर्मिती व पुरवठा करता येणार आहे.
माछील सेक्टर कुपवाडा पासून 65 किलोमीटर लांब आहे. बर्फवृष्टीमुळे हा भाग सहा महिने इतर भागांपासून विभागला जातो. तसेच हे ठिकाण सीमारेषेलगत असल्याने घुसखोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असतात. वीज पुरवठा सुरळीत झाल्याने सुरक्षेच्या दृष्टिनेही महत्त्वाचे ठरणार आहे.