परभणी | परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करत त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीत चांगलंच राजकारण तापलं आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी जाधव यांचे आरोप फेटाळून लावणारी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
(चंद्रपूर येथे विविध पदांच्या भरती २०२०)
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अन्याय केला म्हणून खासदार साहेबांनी राजीनामा दिल्याचे कळले.
परभणी जिल्हा परिषद अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, जानेवारी २०२० मध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आम्हाला इतर कोणाच्या पाठिंब्याची आवश्यकता नसताना सुद्धा शिवसेनेला सोबत घेतलं आणि आमच्या हक्काचं एक महत्त्वाचं सभापती पद शिवसेनेला दिल. कारण हे महाविकासआघाडीच सरकार आहे, सर्वांनी एकजुटीने राहून जिल्ह्यात आणि राज्यात काम करून ताकद वाढवावी ही आमची प्रामाणिक इच्छा आहे.”
“याउलट खासदार साहेब आमच्या जिल्ह्यात भाजपला पोषक वातावरण करू पाहत आहेत की काय असा प्रश्न पडतो. कारण जिंतूर मतदारसंघात भाजप आमदार आहे, त्याठिकाणी आघाडीचा मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, ग्रामपंचायत या सर्व संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त आहे. त्यामुळे येथे मित्रपक्षाला मदत करण्याऐवजी भाजपला सहकार्य करण्याचे काम खासदार महोदय करीत आहेत. याशिवाय ते पाथरी व सोनपेठ बाजार समितीमध्ये सुद्धा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत आहेत, याचे कारण काय?”
(भारतीय इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मध्ये विविध पदांच्या भरती २०२०)
“जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य तर बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचे प्रशासक नेमण्याचा निर्णय मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केला होता. त्यावर आक्षेप घेणे चुकीचे आहे, याचा पुन्हा एकदा विचार खासदार साहेबांनी करावा.”
“परभणी जिल्हा परिषदेत शिवसेनेला सभापती पद दिले, जिंतूर मतदारसंघात शिवसेनेची ताकद कमी असताना सुद्धा बोरी कृषी उत्पन्न बाजार समिती शिवसेनेला देण्याचा निर्णय झाला. तर यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अन्याय केला म्हणणे हे पूर्णतः चुकीचे आहे.”
“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर वरिष्ठ नेत्यांनी परभणी जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना एकत्रित बोलवून विचारविनिमय करावा कारण आमची इच्छा आहे की, महाविकासआघाडी सरकार मधील पक्षांनी एकत्रितपणे काम करावे व जिल्ह्यात ताकद वाढवावी. वरिष्ठांचा अंतिम निर्णय आम्हाला मान्य राहील.”
(भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथे विविध पदांच्या भरती २०२०)