पिंपरी- चिंचवड शहर भाजपाची धुरा शहराध्यक्ष म्हणून सहा महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोपवली होती. पण, पक्षातील काहीजणांचा त्यांच्या निवडीला विरोध होता. अनेकांनी खुला तर काहींनी छुपा विरोध केला.
पिंपरी- चिंचवड भाजपामधील अंतर्गत गटबाजी, सुंदोपसुंदी, फंदफितुरीला कंटाळून भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती भाजपाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
पक्षहितासाठी स्व- पक्षातील नाराजांची मोट बांधण्याची भूमिका आमदार लांडगे यांनी घेतली. पण, पक्षात जुने, नवे आणि कथित निष्ठावंत अशी गटबाजी संपता संपत नव्हती. अखेर आमदार लांडगे यांचा संयम सुटला. आज लांडगे यांनी तडकाफडकी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे शहर भाजपामध्ये खळबळ उडाली आहे.