काँग्रेसच्या अध्यक्षपदाबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भावी अध्यक्ष गांधी कुटुंबातील असावा की बाहेरील, यावरून पक्षात दोन गट पडले आहेत. देशभरातील काँग्रेसचे नेतेही त्यांची मतं मांडत आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेतेही यात मागे नाहीत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधी यांच्या नावाला ठाम पाठिंबा दिला आहे. वडेट्टीवार यांनी तर त्यांच्याही पुढे जाऊन अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितल्यास राज्यातील सत्ताही सोडू, असं विधान केलं आहे. त्यामुळे राज्यातील सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं.
वडेट्टीवारांच्या विधानाबद्दल प्रश्न विचारला असता, या सगळ्याकडं आता आम्ही फार लक्ष देत नाही. एका अध्यक्षपदावरून त्यांच्यात इतके वाद सुरू आहेत. सोनिया गांधींना अध्यक्षपदी राहायचं नाही. पण त्यांनाच राहावं लागतं आहे. जे अध्यक्ष पदाचा निर्णय घेऊ शकत नाहीत, ते पुढचे निर्णय कसे घेणार?, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. इतक्या मोठ्या पक्षाची अशी अवस्था का झाली याचं आत्मचिंतन करायला हवं, असंदेखील ते म्हणाले.