मुंबई : सुरुवातीपासुनच राष्ट्रवादीला झुकते माप देत जास्त महत्व दिले जाते असे काँग्रेस नेत्यांनी केलेली तक्रार व अनेक कुरबुरी चालुच असल्याचे दिसून आले होते. काँग्रेसचे ११ आमदार उपोषणाला बसणार असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी निधी वाटपाबाबत दुजाभाव होत असल्याचे सांगत आपली नाराजी उघड केली होती. त्यामुळे आता महाविकास आघाडीत उभी फूट निर्माण होत असून काँग्रेसचे तब्बल ११ आमदार नाराज असल्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले होते.
याआधी राज्यातील पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर देखील सदर विषय घातल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. मात्र, आम्हाला अद्याप न्याय न मिळाल्याची खंत आमदार गोरंट्याल यांनी व्यक्त केली असून लवकरच सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर, आमदार कैलास गोरंट्याल हे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे जानेवारी महिन्यातच समोर आले होते, त्यावेळी ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते.अखेर याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मौन सोडले आहे. “आमदारांशी बोलून त्यांचं आम्ही समाधान करु,” अशी पहिली प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. “आमच्यासह मित्रपक्षांचे आमदार सुद्धा नाराज आहेत, त्यांचीही नाराज आम्ही दूर करु,” असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.
“राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळाली पाहिले, ही अपेक्षा आहे. काही घटना घडल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्यात सुधारणा करु, असे स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले असल्याचे देखील थोरात यांनी स्पष्ट केले. “आमदारांना मतदारसंघ सांभाळायचा आहे म्हणून ते लढत आहेत. आमच्या पक्षातील नाराजी आणि आघाडी सरकारचा काही संबंध नाही. मतदार संघाच्या प्रश्नांसाठी आमदार नाराज आहेत. आमच्यासह मित्र पक्षांचे आमदार सुद्धा नाराज आहेत, त्यांचीही नाराज आम्ही दूर करु,” असे त्यांनी सांगितले.दरम्यान, “ उपमुख्यमंत्री अजित पवारांचा काल दुपारी 3.40 वाजता फोन आला होता. तुमची नाराजी मी दूर करणार असल्याचे ते म्हणाले. निधी 31 मार्चच्या आधीचे होते. येणारा नवीन फंड आम्ही तुमच्या नगरपालिकेला देणार आहोत” असे अजित पवार यांनी सांगितल्याची माहिती काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.