गावोगावच्या उत्सवातल्या प्रथा आणि परंपरा आपल्याला माहिती असतात. पण केवळ गोंधळ आणि हुल्लडबाजीच्या सवयीमुळे उत्सवामध्ये त्याला परंपरेचं स्वरुप येऊन गेल्याचं तुम्हाला माहिती आहे का?
हे असं मुंबईत घडलं होतं आणि तेही गणेशोत्सवाच्याबाबतीत. त्या प्रथेचीच ही कहाणी.
एखाद्या प्रदेशाला किंवा गावा-शहराला तिथल्या भौगोलिक, औद्योगिक वैशिष्ट्यांमुळे ओळख मिळते तशी सांस्कृतिक, सार्वजनिक वैशिष्ट्यांमुळेही मिळत असते. कालांतराने हे सांस्कृतिक घटक आणि ते गाव यांचं अतूट मिश्रण बनून जातं आणि नंतर दोन्ही घटक एकमेकांमध्ये इतके मिसळून जातात की त्यांना वेगळं करणं कठीण होतं. मुंबई आणि गणपती उत्सव हे समीकरणही असंच आहे.
मुंबईमध्ये शतकानुशतके कोकणातील, गोमंतकातले लोक स्थायिक होत गेले. येताना त्यांनी आपल्या सण समारंभाच्या परंपराही आणल्या. गणपती उत्सवाचं स्थान बळकट होण्यामध्ये या स्थलांतराचा वाटा मोठा आहे.
आजच्या गणपती उत्सवाचे स्वरुप हे मोठ्या डामडौलाचं आणि भव्य वाटत असलं तरी हे स्वरूप एका रात्रीत तयार झालेलं नाही. काही शतकांची परंपरा त्यामागे आहे.
साधारणतः 1820-40 या काळापासून मुंबईतल्या गणपती उत्सवाची वर्णनं मिळतात. सार्वजनिक गणेशोत्सव जरी 20 व्या शतकाच्या शेवटच्या दशकात सुरू झाला असला तरी गणपतीच्या वेळच्या उत्साहाची आणि सजावटीची परंपरा त्याआधी कित्येक दशके अस्तित्वात आलेली दिसते.