अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची मोठी बहीण, माजी फेडरल न्यायाधीश मेरीअॅन ट्रंप यांनी आपला भाऊ तत्त्वहीन असल्याचं म्हटलं आहे. या संभाषणाच्या गुप्त रेकॉर्डिंगमध्ये हे उघड झालंय.
मेरीअॅन ट्रंप बॅरी यांनी राष्ट्राध्यक्षांवर केलेल्या टीकेचं हे रेकॉर्डिंग त्यांची भाची मेरी ट्रंप यांनी केलं होतं. मेरी ट्रंप यांनीच मागच्या महिन्यात डोनाल्ड ट्रंप यांच्यावर लिहिलेलं पुस्तक प्रकाशित केलं आहे. “ते अखंड बडबड करणारे आणि खोटारडे आहेत. देवा, त्यांचा खोटेपणा आणि क्रौर्य…” असं मेरीअॅन ट्रंप बॅरी म्हणत असल्याचं या रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येतंय.
आपल्यावर भविष्यात खटला दाखल होऊ नये म्हणून आपण हे रेकॉर्डिंग केल्याचं मेरी ट्रंप यांनी म्हटलं आहे.
व्हाईट हाऊसकडून प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात ट्रंप यांनी या प्रकरणावर उत्तर दिलंय. ते म्हणतात, “रोज काही ना काहीतरी असतंच. याच्याकडे कोण लक्ष देतंय.”
या रेकॉर्डिंगबद्दल वॉशिंग्टन पोस्टने पहिल्यांदा बातमी दिली होती. त्यानंतर असोसिएट प्रेसने ते रेकॉर्डिंग मिळवलं.
या गुप्त रेकॉर्डिंगमध्ये श्रीमती बॅरी ट्रंप यांच्या स्थलांतरित लोकांविषयक धोरणावर टीका करत आहेत. या धोरणामुळे लहान मुलांना सीमेवरच्या डिटेन्शन सेंटर्समध्ये त्यांच्या पालकांपासून वेगळं ठेवलं गेलं होतं. “त्यांना फक्त आपल्या समर्थकांना खूश करायचं आहे,” त्या म्हणाल्या.
आपल्या ‘टू मच आणि अँड नेव्हर इनफ : हाऊ माय फॅमिली क्रिएटेड द वर्ल्डस् मोस्ट डेंजरस मॅन’ या पुस्तकात मेरी ट्रंप यांनी दावा केला आहे की त्यांचे मामा – डोनाल्ड ट्रंप यांनी विद्यापीठात अॅडमिशन मिळवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या SAT या परिक्षेत मित्राला बसवलं. यासाठी त्यांनी त्या मित्राला पैसेही दिले होते.श्रीमती बॅरी या घटनेचा उल्लेख या रेकॉर्डिंगमध्ये करताना दिसून येतंय. ट्रंप यांनी ज्या मित्राला पैसै दिले तोही आपल्याला आठवतो असा ओझरता उल्लेख आहे.
“त्यांना (ट्रंप) युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिलव्हेनियामध्ये अॅडमिशन कशी मिळाली? कारण त्यांनी आपल्याऐवजी परीक्षा देण्यासाठी दुसरं कोणाला तरी पैसे दिले.”
श्रीमती बॅरी यांनी सार्वजनिकरित्या ट्रंप यांना नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि म्हटलंय की त्या दोघांमध्ये नेहमीच आपुलकीचे संबंध होते. आपल्याला दवाखान्यात दाखल केलेले असताना ट्रंप कसे त्यांना रोज भेटायला यायचे याची आठवणही त्यांनी एकदा सांगितली होती.
“ते एकदा आले असते तरी चाललं असतं, त्यांचं कर्तव्य पूर्ण झालं असतं. पण तरी ते रोज यायचे. हे प्रेम आहे, कारण तुम्ही समोरच्यासाठी अधिक मेहनत घेत असता.”
त्यावेळेस त्या असंही म्हणाल्या होत्या की, “डोनाल्डशी स्पर्धा करण्याच्या भानगडीत मी कधीच पडले नाही.”
कॅलिफोर्नियातल्या एका वरिष्ठ कोर्टाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी स्टेफनी क्लिफर्ड उर्फ स्टॉर्मी डॅनियल्स यांना 44,100 डॉलर्स द्यावेत असा आदेश दिला आहे.
त्या दोघांमध्ये असलेले संबंध स्टॉर्मी यांनी जगजाहीर करू नयेत म्हणून गुप्ततेचा कायदेशीर करार केला आहे. त्या कायदेशीर कराराचा खर्च मिळावा म्हणून हे पैसे स्टॉर्मी डॅनियल्स यांना देण्यात यावेत असं कोर्टाने म्हटलं आहे.
ट्रंप यांनी लेक टाहो, कॅलिफोर्निया इथल्या एका हॉटेल रूममध्ये आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवले असं डॅनियल्स यांचं म्हणणं आहे. ही घटना 2006 साली घडली असल्याचं त्या सांगतात. पण राष्ट्राध्यक्षांनी या घटनेचा इन्कार केला आहे.
ऑक्टोबर 2016 मध्ये, म्हणजेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या काही दिवस आधी स्टॉर्मी डॅनियल्स यांनी गुप्ततेच्या करारावर सही करत आपण या प्रकारावर आता तोंड गप्प ठेवू असं म्हटलं. याबदल्यात त्यांना 13 लाख डॉलर्स दिले गेले.