मुंबई – काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी असलेल्या सोनिया गांधी यांनी पद स्वीकारुन वर्ष होत आहे. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज होत आहे. या बैठकीत सोनिया गांधी राजीनामा देण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन गट पडले आहेत. एका गटाची मागणी ही सोनिया गांधी अध्यक्षपदी राहाव्या, तर दुसऱ्या गटाने राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी केली आहे.
यावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सोनिया गांधी यांनी संकटात काँग्रेसला सांभाळलं आहे. मात्र त्यांच्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांना पसंती आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
राहुल गांधी यांनी चर्चा करुन महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला होकार दिला होता. अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधी यांनी सरकारमधून बाहेर पडण्यास सांगितल्यास आम्ही सत्ता सोडू. काँग्रेसजन म्हणून आम्ही हायकमांडच्या निर्णयासोबत आहोत, असंही यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले.