बळ पंखात अमुच्या भरुदे चित्र काढू नव्याने उद्याचे ‘शांतीवन’ची मंदाकिनी मुंबईत कोरोना रुग्णांच्या सेवेत

बीड दि.24: आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शांतिवन ने आपल्या सर्वांच्या मदतीतून सुरू केलेल्या संगोपन आणि पुनर्वसन प्रकल्पातील मुलं आता हळूहळू स्वतःच्या पायावर ऊभी राहू लागली आहेत. कायमचा दुष्काळामुळे होरपळून निघालेल्या कुटुंबातील कुटुंबप्रमुखाने आत्महत्या केल्यानंतर अक्ख कुटुंब रस्त्यावर येतं. यात जास्त बरबाद होतात ती आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची लेकरं. वेळीच त्यांना आधार मिळाला नाही तर या चिमुकल्यांचं आयुष्य उध्वस्त होतं. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून शांतिवन ने हा विषय हाती घेतला आणि या मुलांच्या संगोपन, शिक्षण आणि पुनर्वसनासाठी काम सुरू केले. 200 मुलांना दत्तक घेऊन सुरू केलेल्या या कामाची उपलब्धी आता होऊ लागली आहे. शिकून मोठी झालेली लेकरं आज स्वतःच्या पायावर उभी राहू लागली आहेत. रोज एक यशोगाथा घडत आहे. नुकतीच नर्सिंग चे शिक्षण पुर्ण केलेली आपली मंदाकिनी ही शांतिवन कन्या मुंबईत नामांकित हॉस्पिटलमध्ये कोरोना ग्रस्तांच्या सेवेत रुजू झाली. खुप चांगल्या पगारावर तिची निवड करन्यात आली आहे. हे सर्व तुमच्या सर्वांच्या मदतीने घडत आहे. ज्यावेळी हा प्रकल्प सुरू केला त्यावेळी लेकरांच्या पंखात बळ भरताना मुलं नेहमी गीतांच्या ओळी गुणगुणत होती

बळ पंखात अमुच्या भरुदे
दुःख सारे गळुनी पडू दे
चित्र काढू नव्याने उद्याचे
रंग भरतील तेंव्हा भरुदे

आणि खरच त्यावेळी आम्ही फक्त या चिमुकल्यांच्या पंखात बळ भरण्याचे काम करीत होतो ..मुलं उद्याचे चित्र काढत होते. आणि आता हळूहळू त्यांच्या या आयुष्याच्या चित्रात रंग भरणं सुरू झालं आहे…
हे सर्व तुमच्यामुळे..
मंदाकिनी ची खुप दिवसांपूर्वी लिहिलेली ही कथा पुन्हा इथे देत आहे .
www.shantiwan.org

माझी आनंदयात्रा बळ हवे पंखांना

शांतिवन चे काम करीत असताना रोज एक समाजातील भीषण वास्तव समोर येत असते . अनेक संकटांनी उध्वस्त झालेली आणि अनेक प्रश्नांशी लढा देत व्याकुळ झालेली माणसे पहिली की काम करण्यासाठी ठरवुन घेतलेल्या क्षेत्राच्या भिंती आणि सीमा आपोआप गळून पडतात . कामाच्या कक्षा रुंदवाव्या लागतात . शांतिवनचाही प्रवास असाच आहे .शांतिवन चे काम करीत असताना रोज एक समाजातील भीषण वास्तव समोर येत असते . अनेक संकटांनी उध्वस्त झालेली आणि अनेक प्रश्नांशी लढा देत व्याकुळ झालेली माणसे पाहिली की काम करण्यासाठी ठरवुन घेतलेल्या क्षेत्राच्या भिंती आणि सीमा आपोआप गळून पडतात . कामाच्या कक्षा रुंदवाव्या लागतात . शांतिवनचा प्रवासही असाच आहे . उसतोडीच्या कामावर असताना अपघात होऊन मृत्यू पावलेल्या पालकांच्या अनाथ मुलांसाठी आम्ही हे पालन पोषण आणि शिक्षणाचे काम सुरू केले . आम्ही पुढे गेलो आम्हाला रस्त्यावर भिक मागणारी मुलं दिसली आम्ही त्यांच्यासाठी काम सुरू केले . आम्ही पुढे गेलो आम्हाला तमाशा कलावंतांची मुलं दिसली आम्ही त्यांच्यासाठी काम सुरु केलं . आम्ही पुढे गेलो आम्हाला लालबत्ती भागात देहविक्री करणाऱ्या महिलांची मुलं दिसली आम्ही त्यांच्यासाठी काम सुरू केले . आम्ही पुढे गेलो मराठवाड्यात सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे सततच्या नापिकीला कंटाळून हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या .आम्ही आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम सुरू केले . हे काम सुरू करताना आम्ही अशा मुलांची शोधमोहीम राबवली . पन्नास कार्यकर्त्यांची 25 पथके सर्वत्र फिरत होती . आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी भेटी देत होती . त्या कुटुंबाची परिस्थिती जाणून घेत . विधवा आईला समजावून सांगत आणि पहिली ते दहावी पर्यंत च्या मुलांना पालन पोषण आणि शिक्षणासाठी शांतिवन मध्ये घेऊन येत .
हा सर्व्हे करीत असताना कार्यकर्त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की छोट्या मुलांना तर आपण घेऊन जात आहोत पुण्यातील भारतीय जैन संघटनेनेही बऱ्याच छोट्या मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे . पण मोठ्या मुलांसाठी कुणी मदत करीत नाही ऐन उच्चशिक्षण घेण्याच्या वेळीच वडील निघून गेले . कुटुंबावर वाईट वेळ आली . अश्या परिस्थितीत शिक्षण सोडण्याची वेळ मोठया प्रमाणावर मुलामुलींवर आली . आता यांचे शिक्षण होऊच शकत नाही असा विचारमनात आला . आणि यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे वाटू लागले . त्यातूनच उदयास आला शांतिवन चा तारांगण प्रकल्प . या प्रकल्पात आज चाळीस च्या वर मुलंमुली शिक्षण घेत आहेत .आपले स्वप्न आता अपूर्णच राहील अशी ज्यांना भीती वाटत होती त्या मुलांच्या पंखात शांतिवन ने बळ दिले .


याच मोहिमेत भेटलेली मंदाकिनी. तिची ही गोष्ट .


केज तालुक्यातील देवगाव हे गांव . याच गावातील गणपती लिंबाजी नागरगोजे हे शेतकरी . खरं तर पाच एकरचे शेती मालक पण सावकाराने टाकलेल्या फासात साडेचार एकर जमीन सावकाराने गिळंकृत केली यामुळे उरलेल्या अर्धा एकर जमिनीवर शेती करीत शेतमजूर होण्याची वेळ या माणसावर आली .गणपतरावला दोन पत्नी सुनंदा आणि आशाबाई .पहिली पत्नी सुनंदा हिला तीन मुली झाल्या . ऊसतोड कामगार मजुरात शिक्षणाचा अभाव असल्याने प्रचंड अज्ञान . मुलगा हवाच ही प्रचंड इच्छा आणि तो होत नाही मुलीच होतात याचा दोष पत्नीवर देऊन मुलासाठी दुसरे लग्न करण्याची घाई .गणपतराव नेही हेच केले . मुलगा होत नाही म्हणून अशाबाई सोबत दुसरे लग्न गेले . तिलाही चार मुली आणि एक मुलगा झाला .बारा तेरा माणसाचे कुटुंब चालवायचे म्हणजे मोठी कसरत . थोडी जमीन आणि ऊसतोड करूनही घरातील आर्थिक जुळवाजुळव करणे कठीण .त्यातच मुली मोठया होऊ लागल्या एक एक करीत पाच मुलींचे लग्नही करून टाकले . मिळतील त्या मुलांना मुली देऊन मोकळे होणेच गणपतराव ने पसंत केले . पण कुटुंबाचा रोजचा खर्च करण्याइतपत ही पैसे मिळत नसताना लग्न करणे म्हणजे मोठे कठीण काम . मग त्यांनी जवळच्याच एका सावकाराकडे जमीन गहाण ठेवून पन्नास हजाराचे कर्ज घेतले . प्रत्येक वर्षी एका मुलीचे लग्न करताना नाकात दम येत होता .पण समोर आलेलं कर्तव्य पार पाडणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते . सावकाराचे घेतलेले कर्ज प्रचंड मोठ्या व्याजदरामुळे वर्षात दुपटीने वाढत चालले होते . उत्पन्नाचे साधन नाही कुणाची मदत नाही खर्च मात्र सुरूच होता . सावकाराचा रोज तगादा असूनही त्याचे कर्ज जात नव्हते .रोज घरी येऊन सावकार सारखी पैशाची मागणी करायचा खाली पाडून बोलायचा . लग्नासाठी पैसे घेतलेल्या इतर लोकांच्याही घरी चकरा सुरूच होत्या . हे सर्व टेन्शन असतानाच सहावी मुलगी मंदाकिनी ही लग्नाला आलेली . तिची इच्छा तर शिकायची पण परिस्थिती नसल्याने शिक्षण काय देणार …? आपण आपल्या मुलीला शिक्षण देऊ शकत नाही याचीही खंत गणपतरावच्या मनाला सारखी बोचत होती . पण सारे काही निमूटपणे सहन करीत बसण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय त्यांना सुचत नव्हता . या विवंचनेत असतानाच एक दिवस सावकाराने निरोपपाठवला ‘आठ दिवसात पैशाची व्यवस्था झाली नाही तर शेतीवर कब्जा करण्यात येईल . जिवापाड जपलेली वडिलोपार्जित शेती सावकाराच्या घशात फुकटात जाणार ही कल्पनाही गणपतरावला सहन होणारी नव्हती . पण परिस्थिती पुढे सारे काही सहन करीत शांत बसण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता . मराठवाड्यातील सावकारकिने अनेकांचे प्रपंच स्वतःच्या घशात घालून त्यांना देशोधडीला लावले आहेत . आता गणपतची बारी आली होती . एकमेव आधार असणारी आपली जमीन गेली तर इतर सावकारांची देने आपण देणार कसे ..? राहिलेल्या दोन मुलींची लग्न मुलाचे शिक्षण करणार कसे..? या प्रश्नाचे उत्तर त्याला स्वतःला सापडत नव्हते . गणपतराव सावकाराकडे गेले . धाय मोकलून रडले . ‘माझी जमीन घेऊ नका माझ्या लेकरांची ती भाकरी आहे … मी माझ्याकडे आले की तुमचे पैसे व्याजासह परत देईल अशी विनंती शंभरदा करू लागले .
पण ऐकेल तो सावकार कसला ..? गणपतराव पैसे देऊ शकले नाही . शेवटी सावकाराने जमीन ताब्यात घेतली.
गणपतराव नागरगोजे आणि परिवाराला रस्त्यावर आणणारी ही घटना होती . या घटनेने गणपतरावला मोठा धक्का बसला . ते एकटे एकटे राहू लागले . घरात चीड चीड करू लागले .सारखा तो विचार त्यांना सोडत नव्हता . आता आपले होणार कसे याच चिंतेने त्यांना ग्रासले होते .
शेवटी व्हायचे तेच झाले गणपतराव चा छोटा भाऊ गावात धापा टाकत पळत आला . दादाने फाशी घेतली म्हणून ओरडून लोकांना सांगू लागला. गणपतराव चा परिवार आणि गावातील इतर लोक शेताकडे धावत सुटले . लिंबाच्या झाडाला दोर बांधून गणपती ने स्वतःला लटकवून घेतले होते . साऱ्या परिवाराने एकच टाहो फोडला … आता सारे संपले होते …..
मंदाकिनी च्या आईने सांगितलेली ही हकीकत ऐकून सावकारकी आणखी किती बळी घेणार ….? असा प्रश्न मी स्वतःलाच विचारला . पण त्याचे उत्तर मला अजूनही मिळालेले नाही . मी मंदाकिनी ला विचारले’ तू काय करतेस …?’ ..’ माझी बारावी झालीय ..’

‘पुढे शिकणार का …? ‘ ‘ आता कोण शिकवणार …? ‘
तिच्या या प्रश्नावर उत्तर शोधायचे मी ठरवले . तिला विचारले तुला काय शिकायचं आहे …? त्यावर ती म्हणाली लवकर जॉब मिळेल म्हणून नर्सिंग करेल मी . ओके म्हणालो मी . शांतिवन चे विश्वस्त सुरेश जोशी यांना फोन लावला . मंदाकिनी साठी आपल्याला काहीतरी करायचे आहे असे सांगितले . त्यांनी लगेच दिशा परिवार चे राजाभाऊ चव्हाण आणि विजय जोशी यांना विनंती केली . ते काही मदत करायला तयार झाले . उर्वरित मदत शांतिवन करेल असा निर्णय सुरेश जोशी आणि इतर विश्वस्थानी केला . मंदाकिनी च्या पैशाची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली . तिला केज येथील नर्सिंग कॉलेज ला जी एन एम साठी प्रवेश घेऊन दिला . तिनेही त्याची जाणीव ठेवत खुप अभ्यास केला . आता मंदाकिनी नर्सिंग च्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे . अशा कितीतरी मंदाकिनीना आधाराची गरज आहे . समाजातील चांगल्या व्यक्तींनी त्यांच्या पाठीशी उभा रहायला हवे ….
वंचित मुलांची मोठी झेप घेण्याची क्षमता असते पण फक्त त्यांच्या पंखात बळ ओतणारा कुणीतरी हवा असतो …!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!