रखडलेले भुयारी गटार, अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने पुर्ण करा-संदीप क्षीरसागर

बीड (प्रतिनिधी):-बीड शहरात नगर परिषद, जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून अमृत अभियानांतर्गत भुयारी गटार व पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. सदर दोन्ही योजनेचे काम पुर्ण करण्याचा कालावधी 24 महिन्याचा होता. सदर काम पुर्ण करण्याची मुदत संपलेली असतांना काम पुर्ण होणे तर दुरच कंत्राटदार, पालिका प्रशासन यांनी संगनमत करत शहरातील रस्ते पुर्ण पणे खोदुन टाकले, जागोजागी मोठमोठे खड्डे खोदले, काम अर्धवट अवस्थेत सोडले, यात निष्पाप लोकांचा अपघात होवून बळी जावू लागला आहे. काम तातडीने पुर्ण करण्यात यावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असतांना नगर पालिकेकडून जाणीवपुर्वक टाळाटाळ होवू लागल्याने रखडलेले काम तातडीने पुर्ण करा.

विशाल धांडेंच्या मृत्यूस कारणीभुत ठरलेल्या कंत्राटदारावर गुन्हा नोंद करा अशा सूचना आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. बीड शहरात नगर परिषद, जीवन प्राधिकरण यांच्या मार्फत सुरू असलेली अमृत अभियानांतर्गत भुयारी गटार व पाणी पुरवठा योजनेच्या नावाखाली शहरातला विकास पुर्णपणे उघडा पडलेला आहे. रस्ते पुर्णपणे खोदून टाकले आहेत, सदर योजनांचे कामे अर्धवट अवस्थेत असल्याने नव्याने आणलेला निधी या अर्धवट कामांमुळे खर्च केला जावू शकत नाही. असे असतांना विशाल धांडे रा.अंबिका नगर, पालवण रोड हे घरी जात असतांना त्यांचा भुयारी गटार योजनेच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूस कारणीभुत असलेल्या पालिकेच्या, जीवन प्राधिकरणच्या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी या भागातील नागरिकांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्याकडे केली. त्यानंतर आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी संबंधित घटनास्थळाची पाहणी करत विशाल धांडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली, त्यांना आधार दिला. या भागातील नागरिकांच्या निवेदनाचा स्विकार करत त्यांच्या मृत्यू कारणीभुत असलेल्या संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करा असे कडक सूचनाही त्यांनी दिल्या. त्याचबरोबर शहरातील रखडलेले भुयारी गटार व अमृतचे काम तातडीने पुर्ण करा अशा सूचना ही जिल्हा प्रशासनामार्फत नगर पालिका व जीवन प्राधिकरण यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या समवेत नगरसेवक रमेश चव्हाण, गोपाळ धांडे, भाऊसाहेब डावकर, नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ, के.के.वडमारे, नगरसेवक भैय्या मोरे, नगरसेवक रणजीत बनसोडे, नगरसेवक अशफाक इनामदार यांच्यासह आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!