नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले तर… आव्हाडांची भविष्यवाणी

ठाणे:सुशांतसिंह राजपूत प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता पुढील प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र, या निर्णयानंतर सुरू झालेली राजकीय टीका-टिप्पणी अद्यापही थांबलेली नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या बिहारी अधिकाऱ्यांवर शिवसेनेनंतर आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिक शब्दांत तोफ डागली आहे.

सुशांतसिंह प्रकरणाच्या तपासाला एका क्षणी मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असे वळण लागले होते. बिहारच्या पोलीस महासंचालकांनी या काळात अनेकदा वक्तव्ये केली होती. पाडे यांनी एखाद्या राजकीय नेत्याप्रमाणे मुंबई पोलिसांवर टीका केली होती. न्यायालयाच्या निकालानंतरही त्यांनी ‘न्याय की अन्याय पर जीत’ असं म्हटलं होतं. शिवाय, या प्रकरणातील एक संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याबद्दलही असभ्य भाषेत टीका केली होती. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून गुप्तेश्वर पांडे यांचा चांगलाच समाचार घेतला होता. बिहारमधील गुन्ह्यांची उदाहरणे देऊन शिवसेनेनं काही प्रश्न उपस्थित केले होते.

शिवसेनेनंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी गुप्तेश्वर पांडे यांच्याबद्दल एक भविष्यवाणी केली आहे. ‘यदाकदाचित नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री झाले तर बिहारचे पोलीस महासंचालक हे तिथे नक्कीच गृहमंत्री असतील,’ असं आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. हे ट्वीट करताना आव्हाड यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात गुप्तेश्वर पांडे हे भाजपच्या नेत्यांची भाषा बोलत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!