मुंबई |फेसबुकसारख्या माध्यमांवर वाद-प्रतिवाद व्हायला हरकत नाही, पण द्वेष पसरवून देश व समाज तोडणारी भाषा वापरली गेली असेल तर त्यावर पक्षाचा विचार न करता कारवाई व्हायला हवी. द्वेष पसरवणारी व्यक्ती सत्ताधारी पक्षाची आहे म्हणून फेसबुकसारख्या कंपन्यांना डोळेझाक करता येणार नाही. तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आलाय. तेव्हा उद्योग-व्यवसायातले किमान नीती-नियम पाळावेच लागतील. धंदा कमी होईल म्हणून दळभद्री विचार व लढायांचे व्यासपीठ म्हणून फेसबुकसारख्या माध्यमांचा वापर सुरू असेल तर त्याकडे काणाडोळा करता येणार नाही! असे सामनाच्या अग्रलेखतून शिवसेनेने फेसबुक चा समाचार घेतला आहे
फेसबुकच्या व्यावसायिक धोरणावरही टीका केली आहे. भाजपच्या नेत्यांनी काही द्वेष पसरविणारा मजकूर टाकला व त्यावर कारवाई करू नये म्हणून फेसबुकवर दबाव आणला, हे फेसबुक कंपनीनंही मान्य केलं असल्याचं सामनातून सांगण्यात आलं आहे.
तसेच सोशल मीडियावर बदनामी करणं हा पगारी व्यवसाय झाला असून कालपर्यंत मनमोहन सिंग यांच्यावर टीका करणारे याच माध्यमाचा वापर करून मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली अडवतात तेव्हा वाईट वाटत, अशी बोचरी टीकाही शिवसेनेनं सामनातून केली आहे.
हिंदुस्थानात फेसबुक व व्हॉट्सऍप भाजप व संघाच्या नियंत्रणाखाली
त्यांनी या माध्यमांतून खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवला आहे. मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी याचा उपयोग केला आहे, पण आता अमेरिकन माध्यमाने फेसबुकविषयीचे सत्य उघड केले,’’ असे मत राहुल गांधी यांनी समाज माध्यमावरच व्यक्त केले. भाजपच्या काही नेत्यांनी द्वेष पसरवणारा मजकूर फेसबुकवर टाकला व त्यावर फेसबुकने कारवाई करू नये यासाठी दबाब आणला, हे ‘फेसबुक’ कंपनीनेच मान्य केले आहे. यावर फेसबुकच्या हिंदुस्थानातील संचालकांचे सांगणे असे की, ‘‘भाजप नेत्यांवर हिंसाचार पसरवणाऱ्या पोस्टवरून कारवाई केल्यास कंपनीच्या हिंदुस्थानातील व्यावसायिक वाढीला धोका निर्माण होऊ शकतो.’’ हेच फेसबुकचे व्यावसायिक धोरण आहे.