पुण्यात मानाच्या 5 गणपतींसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेश भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण

पुणे, 16 ऑगस्ट : पूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. देशात सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. त्या मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सगळ्यात जास्त आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे. मात्र, यंदाच्या गणेशोत्सावावर कोरोनाचं सावट असणार आहे. अशात गणेशोत्सवासाठी रस्त्यावर मांडव न टाकू द्यायची भूमिका बदलत प्रशासन अखेर एक पाऊल मागे आलं आहे. पुण्यात मानाच्या पाचही गणपतींसाठी मांडव घालण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानाच्या पाचही गणपतीची प्रतिष्ठापना मंदिरातच करावी अशी भूमिका पोलिसांनी घेतली होती. मात्र, ते शक्य नसल्याच सांगत मानाच्या गणपती मंडळांनी मांडव टाकण्याची भूमिका घेतली होती. अखेर प्रशासनाने तडजोड केल्यानंतर आज पाचही मानाच्या गणपतीसाठी मांडव टाकायची सुरूवात केली आहे.

अशात पुण्यातील गणेश मंडळांनी मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या 50 गणेश मंडळांनी एकत्र येत यंदा गणेशोत्सवात मांडव न घालण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भावात पुण्याच्या गणेश मंडळांनी सामाजिक भान राखणारी मोठी भूमिका घेतली आहे. यापूर्वी प्रशासकीय पातळीवर झालेल्या बैठकांमध्ये गणेश मूर्तीच्या उंचीवर आणि उत्सवावर काही अटी घालून उत्सव साजरा करण्याच आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्यातल्या सुमारे 50 मोठ्या गणेश मंडळांनी एकत्र येत रस्त्यावर मांडव न टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

तर त्याऐवजी वर्षभर ज्या छोट्या शेडमध्ये मूर्ती ठेवण्यात येतात त्याच ठिकाणी छोट्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. मंडळाचे पाच कार्यकर्ते रोजची आरती , प्रसाद , पूजा या गोष्टी करतील. महत्वाचं म्हणजे जगभरात पुण्यातल्या गणेश उत्सवातील मिरवणुका या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो त्या मिरवणुका ही रद्द करण्यात आल्यात. यावेळचा गणेशोत्सव हा इंटरनेटचा वापर करून लाईव्ह करण्याचा निर्णय ही या मंडळांनी घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!