पाटोदा: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 8 दिवसात जमीन मिळेल असं आश्वासन देऊन 8 महिने उलटून गेले आहेत. मात्र अजूनही मला न्याय मिळालेला नाही म्हणून 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी धनंजय मुंडे यांच्या गाडीखाली जीव देणार असल्याचा इशारा शहिद वीरपत्नी भाग्यश्री राख यांनी दिला आहे. शहिदांच्या वारसांना दोन हेक्टर जमीन देण्यात यावी असा शासननिर्णय असतानाही बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील लालफितीच्या कारभारामुळे भाग्यश्रींनी आता टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे.
हे वाचा- उत्तर पूर्व सीमा रेल्वे अंतर्गत 4499 पदांकरिता ऑनलाईन अर्ज.
पाटोदा तालुक्यातील भाग्यश्री राख गेली दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात खेटे मारत आहेत. आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्त केली असतानाही त्यांच्या फाईलवर अद्याप सहीच झालेली नाही.
पाटोदा तालुक्यातील शहीद जवान तुकाराम राख यांना 2010 मधील ऑपरेशन रक्षकमध्ये वीरमरण आले. स्वतःचा पती गेल्यानं घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही वीरपत्नी भाग्यश्री कुटूंबाचा गाडा चालवतच राहिल्या. शहिदांच्या वारसांना शासनाकडून 2 हेक्टर जमीन देण्यात यावी, असा निर्णय आहे. पण अधिकारी कुठे ही सहकार्य करत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची खंत भाग्यश्री यांनी व्यक्त केली.
तसेच धनंजय मुंडे यांनी 8 दिवसात जमीन देण्याचं आश्वासन दिलं होतं. यावर आठ महिने झाले. मात्र जमीन अद्याप मिळालेली नाही, म्हणून आता धनंजय मुंडे यांच्या गाडी खाली जीव देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अशा स्वरूपाचं पत्रही त्यांनी सूपूर्त केलं आहे.