मुंबई(प्रतिनिधी):- मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष ना अशोकराव चव्हाण यांचे वक्तव्य हे आश्चर्यजनक आहे. ते आमच्या आंदोलनासंबंधी भाजपबद्दल बोलतात, नेमके त्याबाबत त्यांनी पुरावे द्यावेत, उगाच हवेमध्ये गोळ्या मारण्यात काय अर्थ आहे? उलट आम्ही जसे मराठा आरक्षण समन्वय समितीच्या वतीने सांगत आहोत कि, मंत्री अशोकराव चव्हाण साहेबांचे कोर्टात चुकत आहे, तिथं व्हीसीबाबत सुनावणी नको व्हायला पाहिजे या पाठपुराव्याबाबत चौकयाला लागले आहे, घटनापीठाकडे, एकत्रित सुनावणी अन वकील नेमण्यातही त्याच चुका केलेल्या आहेत, हे आम्ही निश्चित अन खात्रीशीरपणे सांगू शकतो म्हणून त्यांचे वक्तव्य हे नाचता येईना अंगण वाकडे या प्रकारातले असल्याचा पलटवार आ विनायक मेटे यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले कि, या ना अशोक चव्हाण यांच्या चुकांमुळेच आज नोकरभरती थांबली आहे, याबाबत आम्ही ना अशोक चव्हाण यांना दोष देत आहोत, तसे त्यांनी स्पष्टपणे सांगायला हवे कि, भाजपचा कोणता कट आहे, भाजपचा कसला पुरस्कृतपणा आहे, षडयंत्र कोणते आहे? हे स्पष्टपणे सांगावे, उगाच हवेत गोळ्या मारू नये, उलट त्यांच्याच मनामध्ये आरक्षणाबद्दल, मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत हे पाप आहे का? हे त्यांनीच सांगावे, हे मी सांगायचे गरज नाही. मी अगोदर आघाडी सरकार असताना देखील मराठा समाजाच्या प्रश्नावर काम करायचो, गेली ३० वर्षांपासून कोणतेही सरकार असो मी मराठा समाजाच्या प्रश्नावर सातत्याने सरकारला जाब विचारला आहे, आजही तेच करत आहे जे काल करत होतो. जेव्हा ना अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हाही मी राष्ट्रवादीत असताना मराठा समाजाच्या प्रश्नावर संघर्ष केलेला आहे, मग आता कोणता बदल झालाय? त्यांचे ते वक्तव्य हे नाचता येईना अंगण वाकडे या प्रकारातून असून ते बिनबुडाचे असल्याचे म्हणत मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांनी ना अशोक चव्हाणांवर पलटवार केला आहे.