केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि लघु व मध्यम उद्योग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात विदर्भातील दोन जिल्ह्य़ात महामार्गाच्या बांधकामादरम्यान राबवण्यात आलेला जलसंधारण पॅटर्न नीती आयोगाने स्वीकारला असून आता तो संपूर्ण देशात राबवण्याची शिफारस विविध राज्यांना करणार आहे.
विदर्भातील वर्धा आणि बुलढाणा जिल्ह्य़ात हा प्रयोग यशस्वीपणे राबवण्यात आला. त्याबद्दल आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी गडकरी यांचे एका पत्राद्वारे कौतुकही केले आहे.
असा आहे गडकरी पॅटर्न
महामार्गासाठी लागणारी माती व मुरूम उपलब्ध व्हावा म्हणून रस्त्यालगतच खड्डे खोदणे व त्यातील मुरूम घेणे तसेच नदी व नाल्यांचे खोलीकरण करून त्यातून माती काढून ती महामार्गासाठी वापरणे. केलेल्या खड्डय़ात व खोलीकरणामुळे नद्या व नाल्यांमध्ये पावसाळ्यात पाणीसाठा वाढत असल्याने परिसरातील नैसर्गिक जलस्रोतात वाढ होते व त्यामुळे पाणी टंचाईवर मात करता येते व शेतीलाही पाणी मिळते.