राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळून भाजपाशी दोन हात करावेत

थिरूवनंतपुरम – राहुल गांधी यांनी आता अधिक वेळ न घालवता पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारून भाजपशी दोन हात करावेत, अशी मागणी केरळातील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी केली आहे.

या संबंधात त्यांनी राहुल गांधी यांना पत्रच पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आज आपला पक्ष मोठ्या संकटाच्या काळातून जात आहे. सोनिया गांधी यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांच्या कार्यपद्धतीला मर्यादा आहेत.

मोदी-शहा जोडगोळीने लोकशाही आणि घटना याची सारी बंधने बासनात गुंडाऊन ठेवली आहेत. त्यांच्या लोकशाहीवर घाला घालण्याच्या वृत्तीने कॉंग्रेसला कर्नाटक आणि मध्य प्रदेश अशी महत्वाची राज्ये गमवावी लागली आहेत. असाच प्रकार राजस्थानच्या बाबतीत झाला होता पण राहुल गांधी यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर तो फसला आहे.

तथापि भाजपच्या या आक्रमक शैलीला आळा घालण्यासाठी राहुल गांधी यांच्यासारख्या धडाडीच्या नेतृत्वाचीच गरज आहे असेही चेन्नीथला यांनी म्हटले आहे. पक्षाध्यक्षपदासाठीची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सोनिया गांधी याच पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष राहतील असे कॉंग्रेसतर्फे दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते.

त्या पार्श्‍वभूमीवर चेन्नीथला यांनी पाठवलेल्या या पत्राला महत्व आहे. कॉंग्रेसला आता पूर्णवेळ अध्यक्षाची गरज आहे असे पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनीही नुकतेच नमूद केले होते. जर राहुल गांधी यांना पुन्हा पक्षाध्यक्ष व्हायची इच्छा नसेल तर पक्षाध्यक्षपदी दुसरी व्यक्ती नेमावी अशी मागणीही थरूर यांनी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!