टीएमसीच्या प्रमुख नेत्यांची ममता बॅनर्जी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. गुरूवारी पक्षाचे सुवेंद्रु अधिकारी यांनी नाट्यमयरित्या राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली. अधिकारी शनिवारी भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधून अनेक बडे नेते पक्षाला रामराम करत असल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची चिंता वाढली आहे.
हे वाचा : हे घडले नसते तर आज सलमान खान असता या अभिनेत्रीचा पती
मात्र टीएमसीच्या सूत्रांनी सांगितले की, ही तातडीची बैठक नसून पक्षाची नियमित बैठक आहे. यात पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी टीएमसी नेत्यांची चर्चा करणार आहे. पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. मात्र त्याआधीच सत्ताधारी टीएमसीत भगदाड पडत असल्याचं चित्र आहे. पक्षातील मोठ्या नेत्यांपासून स्थानिक पातळीवरील नेते बंडखोरी करून पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे. ममता बॅनर्जी यांच्या जवळचे सहकारी सुवेंद्रु अधिकारी यांच्या राजीनाम्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.
राजीनामा दिल्यानंतर अधिकारी यांनी टीएमसी खासदार सुनील मंडल यांच्या घरी भेट दिली, येथे टीएमसीच्या नाराज असलेल्या नेत्यांची बैठक पार पडल्याचं बोललं जात आहे. अधिकारी यांच्याआधी टीएमसीचे आमदार आणि आसनसोलचे माजी महापौर जितेंद्र तिवारी यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप लावले, त्यांनी मंत्री यांना पत्र पाठवत राज्यातील सरकार राजकीय कारणामुळे त्यांच्या शहराला मिळणारा केंद्राचा निधी स्वीकारत नाहीत, जो आमच्यावरील अन्याय आहे असा आरोप त्यांनी केला.
हे वाचा : भात आणि बटाटे पुन्हा गरम करून खाल्याने शरीराचं होतंय मोठं नुकसान; जाणून घ्या कारण
अधिकारी यांनी राजीनामा दिल्यानंतर तिवारी म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्यानंतर सुवेंद्रु अधिकारी हे लोकप्रिय नेते होते हे नाकारू शकत नाही, पक्षाने त्यांच्यासोबत चर्चा करून समस्येवर तोडगा काढायला हवा होता पण पक्षाला माझ्यासारख्या छोट्या नेत्यांपासून मोठ्या नेत्यांचीही मनधरणी करण्याची गरज वाटत नाही असं तिवारींनी सांगितले.
ममता बॅनर्जींचा पलटवार
बंडखोर नेते पक्षाला रामराम करत असताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, काही लोक जिथे वारं वाहतं त्याठिकाणी जातात पण जे खरे तृणमूल काँग्रेसची आहेत ते पक्षातच आहेत. भाजपा निर्लज्जपणे टीएमसीच्या नेत्यांची शॉपिंग करत आहे, हे कोणत्याप्रकारचं राजकारण आहे? तर दुसरीकडे टीएमसी नेते म्हणतात की, जे नेते पक्ष सोडत आहेत त्यांना विधानसभेत उमेदवारी मिळणार नाही याची भनक लागली आहे. तर कोळसा आणि गो तस्करी प्रकरणात चौकशी करण्याच्या केंद्रीय संस्थेच्या दबावापोटी अनेक नेते पक्ष सोडत असल्याचंही सांगितले जात आहे.
गुरुवारी अधिकारी यांनी राजीनामा दिल्यानंतर टीएमसीच्या आणखी एका आमदाराने पक्षाचा राजीनामा दिला आहे. शीलभद्र दत्ता हे २४ परगना जिल्ह्यातील बैरकपूर येथून आमदार आहेत. शीलभद्र दत्ता यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राजीनामा सोपवला आहे. प्रशांत किशोर यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत त्यांनी राजीनामा दिला. प्रशांत किशोर ज्यापद्धतीने काम करत आहेत, ते मार्केटिंग कंपनीसारखं वाटतं, अशा स्थितीत काम करू शकत नाही असं शीलभद्र दत्त यांनी सांगितले.