मुंबई | कंगणा राणावत आणि शिवसेना यांच्यामध्ये सध्या ट्विटर वॉर सुरु आहे. दरम्यान कंगणा राणावत मुंबईत आली त्यावेळी तिला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली. याच मुद्द्यावरून कंगणाच्या आईने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.
कंगणाची आई आशा राणावत म्हणाल्या, “कंगणाला सुरक्षा पुरवल्याबद्दल मी अमित शहा यांची ऋणी आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने कंगणाला जी वागणूक दिली त्याचा मी निषेध करते. शिवाय माझ्या मुलीबाबत दे शब्द वापरले गेले ते चुकीचे असून निषेधार्ह आहेत.”
आशा राणावत पुढे म्हणाल्या, “आज संपूर्ण देश माझी मुलगी कंगणासोबत उभा आहे. या गोष्टीचा मला फार आनंद आहे. इतक्या लोकांचे आशिर्वाद माझ्या पाठिशी आहेत. कंगणाने नेहमी सत्याची बाजू धरली आहे. यापुढे देखील ती सत्यावर ठाम राहील याची मला खात्री आहे. मला माझ्या मुलीचा फार अभिमान आहे.”
काही दिवसांपूर्वी कंगणा राणावतने मुंबई पाकव्याप्त काश्मिर वाटत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेना विरूद्ध कंगणा असा ट्विटर वॉर सुरु झाला. कंगणाने 9 तारखेला ‘मी मुंबईत येणार असून कोणाची हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा’ असं सांगितलं होतं. यासाठीच कंगणा राणावतला खास सुरक्षा पुरवण्यात आली.