भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि कोल्हापूर भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या राजीनाम्याची मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. या सर्व घटनाक्रमामुळे चंद्रकांत पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे. कोल्हापूरमध्ये भारतीय जनता पक्षात उभी फूट पडली आहे.
हे वाचा : आत्महत्येस प्रवृत्त केले; नवरा व सासुला २ वर्षे कारावास
चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी नुकतीच झालेली विधानपरिषद निवडणूक गांभीर्याने घेतली नसल्याचा आरोप भाजपच्याच कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या पराभवाची जबाबदारी घेऊन या दोन्ही नेत्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांना खुलं आव्हान देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राज्य पातळीवर खच्चीकरण होणार?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील हे राज्यातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांना नेहमी आव्हान देत असतात. मात्र त्यांच्या जिल्ह्यातून भाजपच्याच कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या नेतृत्त्वाला आव्हान दिलं आहे. त्यामुळे आपल्या विरोधकांना अंगावर घेणारे चंद्रकांत पाटील घरातील हे आव्हान कसं थोपवणार, अशी चर्चा सुरू झााली आहे.
दरम्यान, या सर्व प्रकारामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे. त्यावरही चंद्रकांत पाटील कसं प्रत्युत्तर देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.