मुंबई – पुन्हा एकदा मराठा आरक्षण मिळावं यासाठी मोठं जन आंदोलन करावं लागणार आहे. तसंच कायदेशीर मार्गानंही लढण्यासाठी एकत्र यावं लागणार आहे, असं म्हणत या आंदोलनासाठी कणखर नेतृत्वाची गरज आहे असल्याचं सांगत मुंबई डबेवाहतुक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार संभाजीराजे यांची भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या आंदोलनाचं नेतृत्व त्यांनी स्वीकारावं अशी मागणीवजा विनंतीही त्यांनी केली.
हे वाचा : अधिकाऱ्यावर झाला गुन्हा दाखल,मुख्यमंत्र्यांना दिली खोटी माहिती
मराठा आरक्षणासाठी राज्यात आंदोलनाला वेगळं वळण मिळालेलं असतानाच आता यामध्ये मुंबईच्या डबेवाल्यांनीही आता महत्त्वाची भूमिका बजावण्याचा निर्णय घेतला आहे. तसा निर्णयच त्यांनी थेट खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्याशी भेट घेऊन सांगितला आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे.
जवळपास १३० वर्षे जुन्या अशा एकमेव मराठमोळ्या मुंबई जेवण डबेवाहतुक मंडळाचे रामदास करवंदे, विनोद शेटे, जयसिंग पिंगळे यांनी रायगड येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय सर्वांसमक्ष ठेवला.
भविष्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठ्या जनआंदोलनाची साद दिली तर, त्यावेळी मुंबई जेवण डबेवाहतुक मंडळातील ५००० सदस्य आणि त्यांचा सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी होईल, अशी ग्वाही यावेळी डबेवाल्यांच्या शिष्टमंडळानं संभाजीराजे यांना दिली.