अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवरून पवार कुटुंब पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे. पार्थ पवार यांनी केलेल्या मागणीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारलं होतं. त्यामुळे पवार कुटुंबीयात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली. या प्रकरणात भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गंभीर भाष्य केलं आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्या विदेशी नागरिकत्वावरूनही गंभीर आरोप स्वामी यांनी केला आहे.
स्फोटक विधानासाठी प्रसिद्ध असलेले भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे. मागील काही दिवसांपासून पवार कुटुंब राजकीय वर्तुळात चर्चेत आलं होतं. अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. त्यावरून शरद पवार यांनी फटकारलं. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर पार्थ पवार यांनी “सत्यमेव जयते” असं ट्विट केलं होतं.
पवार कुटुंबातील या घटनांवरून भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पवार कुटुंबीयातील कलहाबद्दल मोठं भाष्य केलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस अतंर्गत कलहामुळे संकटात आहे. कारण शरद पवार आणि अजित पवार यांची उद्दिष्टे वेगवेगळी आहेत,” असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.