‘मला मराठी भाषेची चीड येते’ असे वक्तव्य बिग बॉस 14 मधील स्पर्धक जान सानूने केले होते. मंगळवारी हा भाग प्रसारित झाल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. शिवसेनाही याप्रकरणी आक्रमक झाली होती. अखेर कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित महाराष्ट्राची माफी मागितली होती. त्यानंतर मुलाच्या चुकीबद्दल कुमार सानू यांनीही सोशल मिडियावरून महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे.
हे वाचा : आनंदाची बातमी ! डिसेंबरपर्यंत भारताला मिळणार कोरोनाची लस
गेल्या 40 वर्षात मुंबादेवीच्या आशीर्वादाने मी इतका मोठा झालोय. या भूमीने मला भरभरून दिलंय. मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल अशी कुठलीच गोष्ट माझ्या मनातसुद्धा येणार नाही. माझा मुलगा जान आणि त्याची आई गेली 27 वर्षे माझ्यापासून वेगळे राहतात. त्याच्या आईने त्याच्यावर काय संस्कार केले मला माहित नाही. परंतू जानला असा नालायकपणा सुचलाच कसा? त्याच्या या वक्तव्याबद्दल बाप म्हणून मी माफी मागतो, अशा शब्दांत गायक कुमार सानू यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
यावेळी महाराष्ट्र आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या संबंधांना उजाळा देत आम्ही जे काही आहोत ते महाराष्ट्रामुळेच, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. आपल्याला कोरोना झाला होता. त्यावेळी पालिकेने आपली खूप काळजी घेतली, असे म्हणत त्यांनी पालिकेचेही आभार मानले आहेत.
बिग बॉसने केली जानची कानउघाडणी!
मराठी भाषेबद्दलच्या अवमानकारक वक्तव्यानंतर बिग बॉसच्या कन्फेशन रूममध्ये जान सानूची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली. या ठिकाणी सर्वांच्या भावनांचा आदर केला जातो. त्यामुळे पुन्हा अशी चूक करू नये, अशी समज त्याला बिग बॉसने दिली आहे. ‘माझ्याकडून नकळत चूक झाली असून मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. मराठी भाषिकांना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता,’ अशा शब्दांत जानने देखील महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे.