खासगी रुग्णालयांच्या लुटमारीला आळा घालण्यास ठाकरे सरकार असमर्थ-फडणवीस

मुंबई: राज्यातील खासगी रुग्णालयात करोना रुग्णांकडून वाट्टेल तशी बिलांची आकारणी होत असून खुलेआम सुरु असलेली ही लूटमार रोखण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा दावा विधिमंडळातील विरोधी पक्षाने केला आहे. रुग्णांची लूटमार रोखण्यासाठी कागदी घोडे नाचविणाऱ्या आरोग्य विभागाची चौकशी करण्याची मागणी विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

केवळ सर्वसामान्य करोना रुग्ण खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा होणाऱ्या लुबाडणुकीबाबत बोलत नाही तर सत्ताधारी शिवसेनेचे अनेक पदाधिकारीही याबाबत बोलत आहेत. ठाणे शहराचे महापौर नरेश म्हस्के यांनी तर याबाबत पालिका आयुक्तांनाच पत्र लिहिले आहे. अन्यत्र राज्यात सत्तेत असल्याने शिवसैनिकांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेतील विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. गेले जवळपास पाच महिने खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांकडून लाखांनी उपचाराची बिले वसूल केली जात आहेत. काही रुग्णालयात तर दिवसाचे उपचाराचे बिल पन्नास हजार ते एक लाख रुपये आकारण्यात येत आहे. प्रामुख्याने मुंबई व ठाणे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी करोनाच्या रुग्णांकडून उपचारासाठी किती रक्कम आकारावी याचे ताळतंत्र सोडल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सरकारने ३० एप्रिल रोजी व २१ मे रोजी दोन आदेश जारी केले होते. त्यानुसार करोना रुग्णांवरील उपचारासाठी खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड राखून ठेवण्याचा आदेश ३० एप्रिल रोजी जारी झाला तर २१ मे रोजी खासगी रुग्णालयातील लूटमार रोखण्यासाठी नेमके किती दर रुग्णालयांनी आकारावे त्याचा आदेश जारी करण्यात आला. आजपर्यंत राज्यातील किती खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड सरकारने कधीपासून राखून ठेवले व रुग्णांची लूटमार रोखण्यासाठी काढलेल्या आदेशानुसार किती रुग्णालयांवर कारवाई केली ते सरकारने हिंमत असेल तर जाहीर करावे असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. प्रामुख्याने मुंबई व ठाण्यासह संपूर्ण एमएमआर विभागात करोना रुग्णांची वारेमाप लूटमार आजही सुरु आहे. सरकार केवळ कागदी घोडे नाचवत असून करोनावरील उपचारात कुटुंबाच्या कुटुंब उध्वस्त होत असल्याचे फडणवीस म्हणाले.

मुंबईत बहुतेक पंचतारांकित रुग्णालयांनी गेल्या पाच महिन्यात पोटभर लुटून घेतल्यानंतर जागे झालेल्या सरकारने आता एक नवीन फतवा काढला आहे. रुग्णांची लूटमार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्याची घोषणा केली असून घराबाहेर न पडणारे राज्याचे नेतृत्व असताना भरारी पथके कशी भरारी मारणार असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. मुंबईत नानावटी रुग्णालयाच्या अनेक तक्रारी  आल्याने रडतखडत महापालिकेने एक गुन्हा दाखल केला. मुंबईतील बहुतेक माध्यमातून उपचारांसाठी लाखो रुपयांची बिले,रुग्णांची लूटमार ‘अशा अनेक बातम्या येऊनही सरकारमधील धृतराष्ट्र अजूनही वस्तुस्थिती समजून घेण्यास तयार नसल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. आता आरोग्य विभागाने एक आदेश जारी करून राज्यातील सर्व पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना भरारी पथक स्थापन करून जादा बिल आकारणीची तपासणी करण्यास सांगितले आहे. तसेच तीन दिवसात याबाबतचा अहवाल सादर करण्यास आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

गेल्या पाच महिन्याच्या खासगी रुग्णालयांच्या लुटमारीचा हिशेब एवढे दिवस बघ्याची भूमिका घेणारे आयुक्त, जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी तीन दिवसात कसा सादर करणार, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. आरोग्य विभाग व सरकारची फसवाफसवी आहे. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा हा उद्योग असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले. खरंतर आजपर्यंत म्हणजे आरोग्य विभागाने करोना उपचाराचे दर निश्चित केल्यापासून तसेच खासगी रुग्णालयातील ८० टक्के ताब्यात घेण्याचा आदेश आरोग्य विभागाने जारी केल्यापासून आजपर्यंत राज्यातील सर्व पालिका आयुक्त व जिल्हाधिकार्यांनी काय कारवाई केली याची माहिती सर्वप्रथम प्रधान सचिव व्यास यांनी मागवायला हवी होती, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आदेश काढूनही गेले चार महिने आरोग्य विभाग गप्प का याची सर्वप्रथम चौकशी झाली पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!