रांची | राज्यातील शिक्षणाचा डोलारा हा शिक्षणमंत्र्यांच्या खांद्यावर असतो. शिक्षणमंत्री हा उच्च शिक्षणात प्राविण्य मिळवलेला असावा असा साहजिकच आपला कयास असतो. मात्र केवळ 10 वी पास असताना झारखंडच्या एका आमदाराच्या खांद्यावर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र कमी शिक्षण घेतल्यानं अपराधीपणाची जाणिव वाटल्यानं त्यांनी आता चक्क अकरावीत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे.
जगरनाथ महतो हे झारखंड मुक्ती मोर्चाचे डुमरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. दहावी पूर्ण झाल्यावर शिक्षणाला पूर्णविराम दिलेल्या जगरनाथ यांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे. पूर्णवेळ राजकारणात असल्यानं महाविद्यालयीन शिक्षणाचा गंध नसलेल्या जगरनाथ यांनी शिक्षणासाठी काॅलेजची वाट निवडली आहे.
आपल्या या निर्णयावर बोलताना जगरनाथ म्हणतात की, झारखंड राज्याचा शिक्षणमंत्री म्हणून काम करताना नेहमी माझ्या शिक्षणाबद्धल बोललं जातं. मी केवळ 10 वी पास असल्यानं माझ्यात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती. यामुळेच आता मी अकरावीच्या वर्गात प्रवेश घेतला आहे.
दरम्यान नवाडीह येथील देवी महतो इंटर काॅलेजमधून आपलं अकरावीचं शिक्षण जगरनाथ पूर्ण करणार आहेत. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी जगरनाथ यांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातंय. विशेष बाब म्हणजे जगरनाथ यांना आजतागायत तब्बल 6 वेळा जेलची हवा खावी लागली आहे.