बीड (प्रतिनिधी):
बीड नगरपरिषदेच्या मतमोजणीत आता अत्यंत थरारक वळण पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मोठी आघाडी घेणाऱ्या भाजपच्या उमेदवार डॉ. ज्योती घुमरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (घड्याळ) प्रेमलता पारवे यांनी जोरदार टक्कर दिली आहे. दहाव्या फेरीअखेर डॉ. घुमरे यांचे मताधिक्य मोठ्या प्रमाणावर घटले असून, राष्ट्रवादीने शहरात जबरदस्त ‘कमबॅक’ केल्याचे चित्र आहे.
नगराध्यक्ष पद: १० व्या फेरीअखेरची स्थिती
9 फेरीअखेरची आकडेवारी पाहता, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात काट्याची लढत सुरू झाली आहे.
* डॉ. ज्योती घुमरे (भाजप – कमळ): २६,५३९ मते
* प्रेमलता पारवे (राष्ट्रवादी – घड्याळ): २१,६२८ मते
* आघाडी: डॉ. ज्योती घुमरे यांची आघाडी आता ४,९११ वर खाली आली आहे.
* इतर उमेदवार: स्मिता वाघमारे (तुतारी) १८,८२८ मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत, तर सुरेखा शृंगारे यांना २,१९३ मते मिळाली आहेत.
नगरसेवक पदाचे बलाबल: घड्याळ आणि कमळात चुरस
१८ प्रभागांच्या निकालानंतर नगरसेवक पदाच्या शर्यतीतही राष्ट्रवादीने भाजपला जेरीस आणले आहे. दोन्ही पक्षांमध्ये केवळ दोन जागांचे अंतर उरले आहे.
* भाजप (कमळ): १४ जागा
* राष्ट्रवादी (घड्याळ): १२ जागा (मोठी सुधारणा)
* राष्ट्रवादी – शपा (तुतारी): ०८ जागा
* शिवसेना – शिपा (धनुष्यबाण): ०१ जागा
* शिवसेना – उबाठा (मशाल): ०१ जागा
सुरुवातीच्या 9 व्या फेरीपर्यंत डॉ. ज्योती घुमरे ८ हजार मतांनी पुढे होत्या, मात्र पुढच्या ४ फेऱ्यांमध्ये प्रेमलता पारवे यांनी ही तफावत ३ हजार मतांनी कमी केली आहे. घड्याळाच्या या ‘कमबॅक’मुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण असून, शेवटच्या फेऱ्यांमध्ये निकाल कोणाच्याही बाजूने झुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १८ प्रभागांत १२ जागा जिंकत राष्ट्रवादीने नगरसेवक पदाच्या शर्यतीतही आपली ताकद दाखवून दिली आहे.