दिव्यांगाचे युडी- आयडी प्रमाणपत्र दिले नाही; जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांना निलंबनाचा दणका




मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांचे आदेश


बीड दि.4 (प्रतिनिधी):
      दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या युडी- आयडी प्रमाणपत्र तपासणीनंतर विहित एक महिन्याच्या कालावधीत प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या 14 शिक्षकांना बीड जिल्हा परिषदेने तडकाफडकी निलंबित करून दणका दिला आहे.
      दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांनी  बुधवार दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी चार कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई केली. कारवाईच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 4 रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील 14 शिक्षकांचे निलंबन केल्यामुळे  बोगस प्रमाणपत्र घेतलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्याचे धाबे दणाणले आहे.
       या संदर्भात माहिती असे की, दिव्यांग विभाग यांचे दिनांक 18 सप्टेंबर 2025 च्या पत्रानुसार  दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांच्या आदेशानुसार दि.8 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आली. शिक्षण विभागाच्या ज्या शिक्षकाकडे युडी- आयडी प्रमाणपत्र नव्हते, त्यांना एक महिन्याचा कालावधी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी देण्यात आला होता. 35 शिक्षकांपैकी 14 जणांनी दिनांक 3 डिसेंबर 2025 पर्यंत युडी- आयडी प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 14 शिक्षकांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
     राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी राज्यातील सर्व दिव्यांग प्रमाणपत्राच्या तपासण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान व उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे यांनी तात्काळ टप्प्याटप्प्याने सदर कारवाई सुरू केली आहे.

error: Content is protected !!