परळीतील स्ट्राँग रूमसमोर तणाव: राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते आणि कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची; पोलिसांकडून सौम्य लाठीमार


बीड, परळी: नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमसमोर काल रात्री (बुधवार, 4 डिसेंबर 2025) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते व माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. रात्री 11 वाजता देशमुख हे स्ट्राँग रूमच्या पाहणीसाठी गेले असता, नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप देशमुख यांनी केला. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात देशमुख समर्थक जमा झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे नगरपरिषद कार्यालयासमोर सुमारे दोन तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


या गोंधळादरम्यान, दीपक देशमुख यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप असलेल्या कर्मचाऱ्याचे मेडिकल करण्याची मागणी केली. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती फोनवरून खासदार बजरंग सोनवणे यांना दिली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी, निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. मात्र, जमाव शांत होत नसल्याचे पाहून पोलिसांनी गेटबाहेर उभ्या असलेल्या समर्थकांवर सौम्य लाठीमार केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या संपूर्ण परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


दरम्यान, स्ट्राँग रूम आणि ईव्हीएम सुरक्षिततेच्या मुद्द्यावर हा तणाव वाढल्याचे दिसून आले. यापूर्वी, मंगळवारी मतदान झाल्यावर देशमुख यांनी नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांवर विश्वास नसल्याचे सांगत, उमेदवारांना राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. त्यानंतर स्ट्राँग रूममधील सीसीटीव्ही फुटेज उमेदवारांना पाहता यावे यासाठी पार्किंगमध्ये टीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे.

error: Content is protected !!