मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांचे आदेश
बीड दि.3 (प्रतिनिधी):
दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या युडी- आयडी प्रमाणपत्र तपासणीनंतर विहित एक महिन्याच्या कालावधीत प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना बीड जिल्हा परिषदेने तडकाफडकी निलंबित केले आहे.
दिव्यांग विभागाच्या आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांनी बुधवार दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी सदर कारवाई केली. या कारवाईमुळे बोगस प्रमाणपत्र घेतलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्याचे धाबे दणाणले आहे. जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे.
या संदर्भात माहिती असे की, दिव्यांग विभाग यांचे दिनांक 18 सप्टेंबर 2025 च्या पत्रानुसार युडी आयडी प्रमाणपत्र तपासणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा परिषद सभागृह आणि बीड स्काऊट भवन सभागृहात 8 ऑक्टोबर 2025 रोजी दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्यात आली. या तपासणीसाठी काही कर्मचारी अनुपस्थित होते. ज्या कर्मचाऱ्याकडे युडी- आयडी प्रमाणपत्र नव्हते, त्यांना एक महिन्याच्या कालावधीत प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. एक महिन्याच्या विहित कालावधीत संबंधितांनी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद च्या सामान्य प्रशासन विभागा अंतर्गत चार कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत खालील चार कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
1) श्रीमती जाधव द्वारका आसाराम, कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती माजलगाव
2) सुनील चंद्रकांत कुलकर्णी l, विस्तार अधिकारी (सा.), पंचायत समिती, पाटोदा
3) विष्णू निर्मळ अनंता, वरिष्ठ सहाय्यक, महिला व बालकल्याण विभाग.
4) भिवसेन सोमेश्वर प्रभू, वरिष्ठ सहाय्यक ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद बीड.
राज्याच्या दिव्यांग विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व दिव्यांग प्रमाणपत्राच्या तपासण्याचे आदेश काढले आहेत. त्यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान व उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे यांनी तात्काळ सदर कारवाई केली आहे.