बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कित्येक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. पण, धर्मेंद्र यांच्या निधनाबाबत देओल कुटुंबीयांकडून माध्यमांना अधिकृत माहिती देण्यात आली नाही. पण, अवघ्या अर्ध्या तासांतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा थोरला लेक सनी देओलकडून त्यांना मुखाग्नी देण्यात आला.
धर्मेंद्र यांच्या जुहू येथील राहत्या घरात सोमवारी साधारणतः साडेबाराच्या सुमारास एक रुग्णवाहिका पोहोचली. त्यावेळी चाहत्यांच्या काळजाची धाकधूक वाढलेली. धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं जाऊ लागलं. त्यावेळी धर्मेंद्र यांच्या घरी नातेवाईकांची रांग लागली. धर्मेंद्र यांच्या मुलीही जुहूतल्या घरी पोहोचल्या. याच दरम्यान, धर्मेंद्र यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तेवढ्याच विले पार्ले इथल्या पवनहंस स्मशानभूमीत हेमा मालिनी आणि ईशा देओल या दिसल्या. कुणाला काही कळण्यापूर्वीच सुपरस्टार धर्मेंद्र यांच्यावरील अंत्यसंस्कार उरकण्यात आलेले. अवघ्या अर्ध्या तासांतच धर्मेंद्र यांचा थोरला लेक सनी देओलनं मुखाग्नी दिला आणि तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा बॉलिवूडचा ही-मॅन अनंतात विलिन झाला.
राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
12 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांना त्यांच्या कुटुंबाच्या विनंतीवरून ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला. तेव्हापासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. पण, धर्मेंद्र यांच्यावर ज्यावेळी उपचार सुरू होते. तेव्हा त्यांच्याबाबत अनेक अफवा पसरवण्यात आलेल्या. त्यावेळी देओल कुटुंबियांकडून माध्यमांवर आगपाखड करण्यात आलेली. सनी देओलनं घराबाहेर उभ्या असलेल्या पॅपाराझींना फटकारलंही होते. सनी देओलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला. तसेच, ईशा देओल, हेमा मालिनी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करुन अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलेलं. दरम्यान, असं असलं तरीसुद्धा अद्याप देओल कुटुंबीयांकडून धर्मेंद्र यांच्या निधनाबाबत अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही.