डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी अनंत गर्जेंचे पाय आणखी खोलात, फॉरेन्सिक टीमला अनंत गर्जेंचे घरी.., डॉक्टर म्हणाले…

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (पीए) अनंत गर्जेच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी विविध खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी वरळी पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. गौरी यांच्या कुटुंबियांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी विशेष तपास पथके कार्यरत झाली आहेत.

त्यातच आता फॉरेन्सिक पथक आणि डॉक्टरांचे एक पथक हे अनंत गर्जेंच्या मुंबईतील घरी दाखल झाले आहे. अनंत गर्जे हे मुंबईतील वरळी परिसरातील बीडीडी चाळीत भाड्याने राहत होते. या गंभीर गुन्ह्याच्या तपासाचा एक भाग म्हणून महत्त्वाचे धागेदोरे आणि परिस्थितीजन्य पुरावे हस्तगत करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञ हे गर्जेंच्या घराची झडती घेत आहेत. गौरी गर्जे यांनी नेमके कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली, याबद्दलचे महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न या पथकाकडून सुरु आहे.

गौरी गर्जे यांच्या आत्महत्येपूर्वी किंवा त्यानंतर घटनास्थळी काही महत्त्वाचे बदल झाले आहेत का? तसेच त्यांनी आत्महत्या करतेवेळी काय वस्तूंचा वापर केला होता याचा तपास फॉरेन्सिक विभागाकडून केला जाणार आहे. तसेच यावेळी काहीही सुसाईड नोट सापडते का याचाही तपास फॉरेन्सिक पथकाकडून करण्यात येणार आहे. या पुराव्यांवरून ही आत्महत्या आहे की अन्य काही याबद्दलची माहिती समोर येणार आहे

डॉक्टर काय म्हणाले?

अनंत गर्जे यांच्या घरी तपासणी केल्यानंतर आता डॉक्टर राजेश ढेरे यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली. आम्हाला जे काही अत्यावश्यक गोष्टी वाटल्या त्याचे सॅम्पल आम्ही लॅबला पाठवले आहेत. प्राथमिक माहितीनुसार शवविच्छेदनानंतर जो अहवाल आला त्यावर अनैसर्गिक मृत्यू असे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या शरीरावर जखमा वैगरे याबद्दल जे काही आहे ते आम्ही संबंधित पोलीस ऑफिसरला सांगू. आम्ही आता पोलिस स्टेशनला जात आहोत. तिथे जी काही उर्वरित माहिती आहे त्याबद्दल आम्ही पोलिस स्टेशनला जाऊन चर्चा करु यानंतर मग आम्ही ती माहिती रिपोर्टमध्ये टाकून फायनल रिपोर्ट बनवू, असे डॉक्टर राजेश ढेरे म्हणाले.

दरम्यान डॉ. गौरी पालवे-गर्जे हिच्या आत्महत्येप्रकरणी गौरीच्या कुटुंबियांकडून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. सध्या वरळी पोलिसांनी पती अनंत गर्जेला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!