आंतरवाली सराटी (जालना): मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची तक्रार काल जालना पोलिसांकडे करण्यात आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी त्यांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धोका असल्याचा दावा केला जात असताना, आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी थेट राज्याचे मंत्री आणि बीडचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरच आपली हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी मोठा कट रचल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या आरोपानुसार, या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींच्या आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीगाठी झाल्या आहेत. हत्येचा कट उधळण्यापूर्वी अवघ्या १२ वाजता आरोपी आणि धनंजय मुंडे यांचे बोलणे झाले असल्याचा दावाही त्यांनी केला. जरांगे पाटील यांनी बीड शहरात आरोपी आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक होऊन हत्येचा कट रचला गेल्याचा गंभीर आरोप केला.
इतकेच नव्हे तर, छत्रपती संभाजीनगरजवळ एका ठिकाणी धनंजय मुंडे हे या आरोपींची वाट पाहत उभे होते आणि तिथे त्यांची भेट झाली. त्या भेटीत मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी गोळ्या (काडतुसे) देण्यास सांगितल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला. “मुंडेंचे हे नपुंसक चाळे आहेत, त्यांनी थेट येऊन भिडायला हवे होते,” अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी मुंडेंना आव्हान दिले. त्यांनी यावेळी धनंजय मुंडेंवर अनेक गंभीर आरोप करत, त्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. जरांगे पाटील यांच्या या थेट आरोपामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.