चोरट्यांनी भिंत फोडून ‘गॅस कटर’च्या सहाय्याने लॉकर तोडले
बीड दि. ३०: बीड तालुक्यातील पाली येथील कॅनरा बँकेत गुरुवारी (दि. ३०) पहाटे चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे. या घटनेत चोरट्यांनी बँकेतून जवळपास अठरा लाख रुपयांची रोकड लंपास केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास बँकेच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचे लॉकर तोडून त्यातील सर्व रोकड घेऊन पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चोरट्यांनी वापरलेली साधने, पावलांचे ठसे तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून, विशेषतः दिवाळीमध्ये आणि दिवाळीनंतर, चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या वाढलेल्या घटना बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.