बीडचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बनावट सही आणि शिक्क्याचा वापर करून प्रशासनाची फसवणूक करण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील अशोक वाघमारे या व्यक्तीने उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या लेटरहेडवर तयार केलेले बनावट पत्र जिल्हा नियोजन कार्यालयात सादर केले. या पत्राद्वारे त्याने माजलगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या कामांसाठी, म्हणजेच एकूण एक कोटी रुपयांच्या कामांसाठी तात्काळ निधी मंजूर करण्याची शिफारस केली होती.
मात्र, या पत्रावर शंका आल्याने जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर हिगंणावे यांनी तत्काळ उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे पडताळणी केली. पडताळणीमध्ये, अजित पवार यांच्या कार्यालयातून असे कोणतेही पत्र देण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अशोक वाघमारे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बीडच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे, विशेषतः यापूर्वी देखील भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या निधीबाबत असाच बनावटगिरीचा प्रकार उघडकीस आला होता. पोलीस आता या बनावटगिरीमागील सूत्रधारांचा आणि उद्देशाचा सखोल तपास करत आहेत.