वडवणी शहर ‘कडकडीत बंद’; डॉ. संपदा मुंडेना न्याय मिळेपर्यंत संघर्ष तीव्र


वडवणी: सातारा जिल्ह्यातील फलटण येथे कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद आता त्यांच्या मूळ गावी, बीड जिल्ह्यातील वडवणी शहरात उमटले आहेत. डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी वडवणी शहर आज (तारीख: २८ ऑक्टोबर) कडकडीत बंद ठेवण्यात आले.


शहर बंदची हाक सर्वपक्षीय नेत्यांसह सामाजिक संघटना आणि नागरिकांनी दिली होती, ज्याला शहरातील व्यापारी वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा आणि व्यवहार पूर्णपणे थांबले होते. या बंदच्या माध्यमातून वडवणीतील नागरिकांनी एकजुटीने डॉ. मुंडे यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.

डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, या घटनेमुळे महाराष्ट्रातील महिला अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. वडवणीतील या बंदने डॉ. संपदा मुंडे प्रकरणातील जनआंदोलनाची तीव्रता वाढवली आहे.

error: Content is protected !!