माजलगाव, दि. २५ (प्रतिनिधी):
माजलगाव शहरात दिवाळी पाडव्याच्या रात्री गणपतीचे दर्शन घेऊन घराकडे परतणाऱ्या एका वृद्ध महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत ७७ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे सात तोळ्यांचे दागिने हिसकावून नेले. ही घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास जोशी हॉस्पिटलजवळ घडली.
नेमके काय घडले?
बुधवारी दिवाळी पाडवा असल्याने शहरातील अनेक महिला रात्री गणपती मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शनानंतर महिलांचा एक गट रात्री साडेआठच्या सुमारास घराकडे परतत होता. यशवंत चौक ते बायपास रोड दरम्यान, डॉ. दीपक जोशी हॉस्पिटलसमोर व्यावसायिक प्रकाश व नंदलाल मेहता यांच्या घरासमोर हा प्रकार घडला.
या रस्त्यावर नगर परिषदेच्या पथदिव्यांच्या खांबावर लाईट्स बंद असल्याने बऱ्याच ठिकाणी अंधार होता. याच अंधाराचा फायदा घेत शतायुषी हॉस्पिटलकडून एका दुचाकीवर रुमालाने तोंड बांधलेले दोन तरुण आले. त्यांनी या महिलांना पाहिले आणि पुढे जाऊन दुचाकी वळवून त्या महिलांच्या घोळक्यात घातली. त्यामुळे महिला सैरभैर झाल्या.
वृद्ध महिलेला खाली पाडून लूट
या गोंधळाचा फायदा घेत चोरट्यांनी दुचाकी ७७ वर्षीय ललिताबाई मेहता यांच्या अंगावर घातली. त्यामुळे त्या खाली पडल्या. त्याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील बोरमाळ आणि मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. लुटलेले दागिने सुमारे ७ तोळ्यांचे असून त्यांची किंमत लाखोंच्या घरात आहे.
या घटनेमुळे माजलगाव शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पाडव्याच्या दिवशी भर वस्तीत झालेल्या या चोरीबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.