बीडमध्ये पुन्हा चोऱ्यांचे सत्र! दोन दिवसांत १ लाख ७५ हजारांचे दागिने लंपास


बीड, दि. २५ (प्रतिनिधी):
बीड जिल्ह्यामध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी केवळ दोन दिवसांत चोरीच्या दोन मोठ्या घटनांनी हाहाकार माजवला आहे. या दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.


राक्षसभूवन फाट्यावर मोटारसायकल अडवून लूट
गुरुवार (दि. २३) रोजी छत्रपती संभाजीनगर येथून माहेरी बीडकडे मोटारसायकलवरून येत असताना मोहन भास्कर रेनीवाल हे दाम्पत्य लुटारूंच्या तावडीत सापडले. राक्षसभूवन फाट्याच्या पुढे मोटारसायकलवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांची दुचाकी अडवली. या दरोड्यादरम्यान चोरट्यांनी रेनीवाल यांच्या पत्नीच्या गळ्यातील ५० हजार रुपयांचे दागिने हिसकावून नेले. या प्रकरणी रेनीवाल यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पाटोदा बसस्थानकात सव्वा लाखाची चोरी
दुसरी घटना शुक्रवार (दि. २४) रोजी पाटोदा येथील बसस्थानकात घडली. बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी राजेश्री संदीपान आगाम यांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेले. या घटनेत चोरट्यांनी १ लाख २५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. आगाम यांच्या तक्रारीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!