परळी:
‘माजी मंत्री’ तथा आमदार धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील बोधेगाव येथील एका विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या जीवनातील अत्यंत कठीण आणि भावनिक संघर्षाची गाथा उलगडली. जीवनातील संकटे आणि आरोपांच्या वादळात आपण कसे दोनदा मरता मरता वाचलो, याचा उल्लेख करताना मुंडे अत्यंत भावूक झाले होते.
मुंडे म्हणाले, “ज्या घटनेशी माझा कोणताही संबंध नव्हता, त्या एका घटनेवरून तब्बल २५० दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझी ‘ट्रायल’ चालली. तो काळ माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक होता. त्या अत्यंत कठीण काळात मी दोनदा मरता मरता वाचलो होतो! आज मी तुमच्यासमोर उभा आहे, तो केवळ आणि केवळ मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळेच!”
“माझा जन्म लोकांची सेवा करण्यासाठी...”
सध्याच्या आरोग्याच्या अडचणींवरही मुंडेंनी थेट भाष्य केले. “मी प्रामाणिकपणे सांगतो, मी सगळ्या आजारातून बाहेर पडलो आहे. फक्त आता डोळ्याचं थोडं बाकी आहे…” हे सांगताना त्यांची वेदना स्पष्टपणे जाणवत होती. ते पुढे म्हणाले, “माझा जन्म केवळ लोकांची सेवा करण्यासाठी झाला आहे, म्हणूनच मी आजही तुमच्यासमोर उभा आहे. मला फक्त तुमची सेवा करायची आहे, दुसरे काही नाही.”
विक्रमी विजय असूनही आनंद नाही:
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील विक्रमी विजयाचा उल्लेख करतानाही त्यांच्या मनात एक खंत होती. “मायबाप जनतेने मला १ लाख ४२ हजार मतांच्या प्रचंड आघाडीने निवडून दिले. मतांच्या आघाडीत आपण महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहोत. मात्र, एवढा मोठा विजय मिळूनही, मला तो साजरा करता आला नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आपल्यावर आलेली संकटे ही ‘घडवून आणलेली’ होती आणि अशा संकटातून बाहेर पडणे किती कठीण असते, याची वेदना त्यांनी मांडली. “मला मिळालेल्या मंत्रिपदाचाही आनंद घेता आला नाही,” असे ते म्हणाले.
शेवटी, लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे, असे सांगून त्यांनी बोधेगाव परिसरातील विविध विकास कामांचे लोकार्पण केले आणि यापुढेही भागाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.