नारायण राणे पुन्हा शिवसेनेच्या निशाण्यावर

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नवी मुंबई, 10 ऑगस्ट : भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात एका कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली. राणेंच्या याच टीकेला आता शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

‘सध्या काही जणांना काहीच काम उरलेला नाही म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगलं काम करत आहे. यामुळे सरकार पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नारायण राणेंवर पलटवार केला आहे. तसंच यावेळी शिंदे यांनी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंवर होत असलेल्या आरोपांबद्दलही भाष्य केलं आहे.

‘सुशांत सिंह प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव येत आहे. ती चर्चा तथ्यहीन आहे. त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही..या फक्त चर्चा आहेत,’ असं एकनाथ शिंदे म्हणाले.

काय म्हणाले होते नारायण राणे?

‘बाप बेटे कॅबिनेटला नसतात पण पार्ट्यांना असतात. पण सहा महिने झाले एकाही कॅबिनेटला मुख्यमंत्री उपस्थित नाहीत. हे सरकार पाहुणे आहे पिंजऱ्यातले..ते लवकरच उडून जाईल. मातोश्री हा पिंजरा आहे,’ असं म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!