ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात निर्माण झालेला तणाव आता वाढत चालला आहे. याच तणावातून आतापर्यंत अनेक तरुणांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. राज्यात आरक्षणावरून सुरू असलेल्या संघर्षामुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. लातूर जिल्ह्यातील भरत कराड या रिक्षाचालकाने ओबीसी आरक्षणाच्या चिंतेतून आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. तर आता बीड जिल्ह्यातूनही अशाच दोन दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत.
बीड जिल्ह्यातून दोन दुर्दैवी घटना समोर
बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथील गोरक्ष नारायण देवडकर यांनी ओबीसी आरक्षण आणि त्यांच्या मुलीच्या नोकरीच्या चिंतेतून आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. त्यांच्या मुली पोलीस भरतीची तयारी करत होत्या. परंतु ओबीसी आरक्षण धोक्यात आल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.
आत्महत्या केलेल्या गोरक्ष देवडकर यांच्या मुलीने अत्यंत भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. “आता माझी जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल तिने केला आहे. तिच्या या आर्त हाकेने अनेकांच्या काळजाला वेदना झाल्या आहेत.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील आहेर धानोरा येथील 39 वर्षीय संतोष अर्जुन वळे यांनी मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या निराशेतून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. संतोष वळे हे मराठा आरक्षणाच्या अनेक आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांना मराठा आरक्षणाबाबत चिंता होती. यामुळे, त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.