मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलकांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने, ओबीसी समाज नाराज झाला असून त्याचे पडसाद आता राज्याच्या राजकारणात उमटताना दिसत आहेत. मंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही या निर्णयावर जोरदार आक्षेप घेतला आहे. आज बारामती येथे झालेल्या ओबीसी मोर्चात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली.
शरद पवारांनी महाराष्ट्राच्या मानगुटीवर ‘जरांगे’ नावाचं भूत बसवलं: लक्ष्मण हाके
लक्ष्मण हाके म्हणाले की, शरद पवार यांनीच मनोज जरांगे पाटील यांना पुढे आणले आहे आणि पवारांनी ‘जरांगे’ नावाचे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवले आहे. हाके यांनी शरद पवार आणि अजित पवार या दोघांवरही टीका केली.
मंडल आयोगाबद्दलची टीका:
हाके यांनी शरद पवारांवर मंडल आयोगावरूनही टीका केली. “जर कोणी असं म्हणत असेल की मंडल आयोग शरद पवारांनी लागू केला, तर त्याचं कानफाड फोडा,” असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. देशभरात मंडल आयोग लागू झाला, पण महाराष्ट्रात तो लागू झाला नाही, असं ते म्हणाले. त्यांनी मंडल आयोगाची चळवळ पुढे नेणाऱ्या नेत्यांची नावे घेतली. त्यात शेकापचे दि. बा. पाटील, बबनरावजी ढाकणे, शिवाजीराव शेंडगे, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, अरुण कांबळे आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता.
शरद पवारांवरील वैयक्तिक टीका:
लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांवर वैयक्तिक टीका करत ते ४०० संस्थांचे अध्यक्ष असल्याचा दावा केला. “आपल्या कुटुंबाबाहेर कारखाने किंवा आमदारकी-खासदारकी जाऊ न देणारे हे लोक आहेत,” असे म्हणत त्यांनी पवारांवर निशाणा साधला. रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल असा नियम असताना, त्यात बदल करून शरद पवार स्वतः अध्यक्ष झाले. तसेच, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्षही तेच असल्याचं हाके म्हणाले.
‘डुप्लिकेट ओबीसी’ विरुद्ध लढाई: हाके यांचा इशारा
हाके यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली. “कॅनलच्या कंम्पाऊंडवर गोधडी वाळत घातली तर बघा,” या अजित पवारांच्या विधानाचा संदर्भ देत “कंम्पाऊंड तुझ्या बापाचं आहे का?” असा सवाल त्यांनी केला. “सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा कारखाना,” अशा पद्धतीने हे लोक काम करत असून ते कोणत्याही मंत्रिमंडळात असतातच, अशी टीका त्यांनी केली.
लक्ष्मण हाके यांनी आगामी राजकारणाची दिशा सांगताना एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, आतापर्यंत ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत होती, पण आता जर ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले, तर ओबीसी विरुद्ध ‘डुप्लिकेट ओबीसी’ अशी लढाई होईल. आगामी निवडणुकीत ‘डुप्लिकेट ओबीसी’ विरुद्ध ‘डुप्लिकेट ओबीसी’ अशीच लढत होईल, असे भाकीत त्यांनी वर्तवले.
या मोर्चादरम्यान लक्ष्मण हाके यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला. आंबेडकर यांनी फोनवरून उपस्थितांशी संवाद साधला. “हे आरक्षण जबरदस्तीने दिले आहे, त्यामुळे आता आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल,” असे आवाहन आंबेडकर यांनी केले.